नाशिक : उघड्यावर कचरा टाकू नका… कारण तुमच्यावर आहे तिसऱ्या डोळ्याची नजर

घनकचरा व्यवस्थापन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वच्छ भारत अभियानांतर्गत सलग पाचही वेळा नाशिक महापालिकेला खालच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. परंतु, आता स्वच्छतेविषयी मनपाने पुन्हा एकदा कंबर कसली असून, १०२ ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. शहरातील अनेक ठिकाणी लोक घंटागाडीत कचरा न देता रस्त्यालगतच उघड्यावर कचरा टाकत असल्याने अशा लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने १०२ ब्लॅकस्पॉट निश्चित केले आहेत. या ठिकाणी कॅमेरे बसविण्याबाबत स्मार्ट सिटी कंपनीला प्रस्ताव सादर केला आहे. कचरा टाकणाऱ्यांना ३०० रुपयांपासून तर १५ हजार रुपयांपर्यंत दंड केला जाईल आणि प्रसंगी फौजदारी गुन्हादेखील दाखल करण्याचा इशारा मनपाने दिला आहे. २०१९ मध्ये 10 लाख लोकसंख्या असलेल्या देशभरातील ५०० शहरांमध्ये नाशिक शहराचा ६७ वा क्रमांक आला होता. त्यानंतर मनपाने जाेरदार तयारी केली आणि नाशिकने २०२० मध्ये ११ व्या क्रमांकावर झेप घेतली. परंतु, २०२१ मध्ये नाशिक मनपाचा नंबर १७ व्या क्रमांकावर गेला. २०२२ मध्ये नाशिकचा क्रमांक पहिल्या 10 शहरांमध्ये येऊ शकतो, असा विश्वास होता. मात्र मनपाला २० व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत क्रमांक घसरण्यामागची कारणे शोधून उपाययोजना करण्यात येत असून, घंटागाडी योजनेवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही ब्लॅकस्पॉट बंद होत नाहीत, अशी ठिकाणे कायमस्वरूपी बंद करण्याकरिता मनपाने कंबर कसली आहे. तसेच पुन्हा अन्य नवीन ठिकाणी ब्लॅकस्पॉट निर्माण होणार नाहीत, याची काळजीदेखील घेतली जाणार आहे. त्या अनुषंगाने शहरातील कचऱ्याचे १०२ ब्लॅकस्पॉट पूर्णपणे काढून टाकण्याचे निर्देश आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागासह सहाही विभागीय अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच सीसीटीव्हीची नजर आता रस्त्याच्या कडेला किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर असेल.

नदी प्रदूषित करणारेही रडारवर….
गोदावरी नदीसह तिच्या उपनद्या असलेल्या नासर्डी आणि वाघाडी या नदी परिसरात २६ वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यामुळे नदीमध्ये केरकचरा, निर्माल्य तसेच प्लास्टिक टाकणाऱ्यांवर जरब बसेल. तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी याआधीच सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव स्मार्ट सिटी कंपनीला सादर केला होता. मात्र त्याबाबत पुढे काहीच कार्यवाही होऊ शकली नाही. अन्यथा आतापर्यंत ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी कॅमेरे बसविले गेले असते.

विभागनिहाय सीसीटीव्हींची संख्या अशी…
पंचवटी : १८
सातपूर : १८
नाशिक पूर्व : १६
सिडको : १४
नाशिक पश्चिम : १२
नाशिकरोड : ०७

महापालिकेत पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे सर्वच ठिकाणी मनपा कर्मचारी तसेच स्वच्छता निरीक्षकांकडून लक्ष ठेवले जाऊ शकत नाही. त्यामुळेच ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवून कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. अशा व्यक्तींवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे. – डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग.

हेही वाचा:

The post नाशिक : उघड्यावर कचरा टाकू नका... कारण तुमच्यावर आहे तिसऱ्या डोळ्याची नजर appeared first on पुढारी.