Site icon

नाशिक : उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील – अनंत गिते

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

सध्याचे गलिच्छ राजकारण सर्वसामान्यांना आवडलेले नाही. त्यामुळे आगामी काळ हा खऱ्या शिवसैनिकांचा असून पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे खऱ्या शिवसैनिकांच्या जोरावर विराजमान होतील, असा आशावाद माजी केंद्रीयमंत्री अनंत गिते यांनी व्यक्त केला.

निफाड तालुक्यातील लासलगावात रविवारी दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने शिवगर्जना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निष्ठावान शिवसैनिकांची मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळाली.

व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी, उपनेत्या संजना घाडी, युवा सेना सचिव वरूण सरदेसाई, जिल्हा संपर्कप्रमुख जयंत दिंडे, माजी आमदार कल्याणराव पाटील ,अनिल कदम, जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, अद्वय हिरे, संभाजी पवार, निवृत्ती जगताप, शिवा पाटील सुराशे उपस्थित होते.

शिवसेना पक्षात अनेक बंड झाली. या बंडांना कुठल्याही पक्षाचे पाठबळ नव्हते. मात्र सध्याची बंडखोरी हे भाजपाचे पाप असल्याचे प्रतिपादन अनंत गिते यांनी केले. काही लोक सांगतात की मराठा मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांना सोडले. मात्र एका ब्राह्मण समाजाच्या फडणवीसांना खरं मुख्यमंत्री करायचं होतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता सहानुभूती मिळवण्यासाठी मराठा समाजाला पुढे करण्याचा प्रयत्न शिंदे व त्यांचे सहकारी करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

युवासेना सचिव वरून सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त करताना सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आपला पक्ष संघर्षाच्या कसोटीवर जरी असला तरी सर्वसामान्य व खरा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याने आगामी काळ आपल्या पक्षासाठी सुवर्णकाळ असेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी आपल्या कणखर भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली. आमदार, खासदार विकले गेले, नाव विकत घेतलं, धनुष्यबाण घेतला, मात्र खरा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी सध्या राजकारणाचा जो तमाशा सुरू आहे त्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप केला.

अव्दय हिरे यांनी मनोगतात शिवसेना नाव काढले, चिन्ह काढले पण उद्धव ठाकरे स्वतः पक्ष असल्याचे भावना शिवसैनिकांमध्ये आहे. नवीन पक्षाचे नाव व मशाल चिन्ह घराघरात शिवसैनिक पोहोचतील व आपला जलवा दाखवतील, असे नमूद केले. संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वच विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेना उत्सव बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात पाहायला मिळेल व जास्तीत जास्त आमदार नाशिक जिल्हा निवडून देईल, असे स्पष्ट केले.

शिवगर्जना मेळाव्याचे सूत्रसंचालन पंचायत समिती माजी सभापती शिवा पाटील सुराशे यांनी केले. यावेळी जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जगताप, रतन बोरणारे, शिवसेना विंचूर शहर प्रमुख नाना जेऊघाले ,अभिनव भंडारी, विकास रायते, संतोष पानगव्हाणे, प्रमोद पाटील, ज्योती सुराशे, टाकळी विंचूर येथील महिला पदाधिकारी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील ४६ गावातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post नाशिक : उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील - अनंत गिते appeared first on पुढारी.

Exit mobile version