
नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील उसवाड गावाच्या शिवारातील बोरबन मळा येथे शेतातील विहिरीलगत दोन ठिकाणी सुरू असलेल्या अवैध हातभट्टीची गावठी दारू तयार करण्याचे अड्डे कळवण राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने उद्ध्वस्त केले. यावेळी ३८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत जागेवर नष्ट केला. या घटनेबाबत दोघा भट्टीचालकांविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोघेही फरार आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त बा. हा. तडवी, नाशिकचे अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक ह. बा. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभागाचे निरीक्षक एस. के. सहस्त्रबुद्धे, दुय्यम निरीक्षक ए. एस. पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक एस. के. शिंदे, दीपक आव्हाड, गोकुळ शिंदे, गोरख गरुड या पथकाने हा छापा टाकला. या छाप्यात संतोष किसन पवार या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीजवळ दोन ठिकाणी हातभट्टीची गावठी दारूभट्ट्या आढळल्या. यावेळी १२०० लिटर गूळमिश्रित रसायन, ५० लिटर क्षमतेचे २७ प्लास्टिकचे ड्रम, ११० लिटर तयार गावठी दारू साठा, असा एकूण ३८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दारूच्या भट्ट्या रवींद्र सुरेश जाधव व मोहन पोपट माळी (दोघे. रा. उसवाड) यांच्या असून, ते फरार आहेत. जप्त केलेला माल पंचांसमक्ष नष्ट केला.
हेही वाचा :
- स्वतंत्र बेरियाट्रिक विभाग सुरू करणारे ससून राज्यातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय
- राज्यातील तलाठ्यांना कार्यालयात उपस्थितीचे बंधन ! ग्रामपंचायतीला द्यावे लागणार उपस्थितीबाबत वेळापत्रक
- सर्वांना परवडणार्या दरात आरोग्यसुविधा : पंतप्रधान मोदी
The post नाशिक : उसवाडला गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त appeared first on पुढारी.