नाशिक : एकाच कुटुंबातील सात जणांना जेवणातून विषबाधा 

नाशिक, दिंडोरी: पुढारीे वृत्तसेवा

तालुक्यातील शिवार पाडा येथे एकाच कुटुंबातील सात सदस्यांना जेवणातून विषबाधा झाली असून, सर्वांवर ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले जात आहे.

पश्चिम आदिवासी भागात असलेल्या शिवार पाडा येथे राऊत कुटुंबीयांनी दुपारी जेवण केल्यानंतर सातही व्यक्तींना जुलाब, वांत्या, पोटदुखी असा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना ननाशी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉ. प्रशांत जोशी व इतरांनी उपचार केले. सध्या सुनील देवराम राऊत, विठ्ठल राऊत, राधा राऊत, नंदा राऊत, काशीनाथ राऊत, चंद्रकला राऊत या सहा जणांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे. अन्नपदार्थाचे नमुने घेण्यात आले असून, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी ननाशी आरोग्य केंद्रास भेट देऊन रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दिंडोरीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचारांची माहिती घेतली. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

The post नाशिक : एकाच कुटुंबातील सात जणांना जेवणातून विषबाधा  appeared first on पुढारी.