नाशिक : एटीएममध्ये चोरी करणार्‍याला मिळाला कारावास

सत्र न्यायालय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिंगाडा तलाव येथील स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रात शिरून चोरीचा प्रयत्न करणार्‍याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. चाफळे यांनी पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

शाहीद परवेज गुलाम मुर्तुजा शेख (30, रा. नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. शिंगाडा तलाव येथील एटीएम केंद्रात दि. 29 जुलै 2022 रोजी आरोपी शाहीदने एटीएम केंद्रात शिरून ते फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, एटीएममधील बझर वाजल्याने यंत्रणा सतर्क झाली, तर शाहीद तेथून पसार होत होता. याबाबतची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळताच रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाने शाहीदला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिस उपनिरीक्षक जे. के. माळी यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. विद्या देवरे-निकम यांनी न्यायालयात युक्तिवाद करत साक्षीदार तपासले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चाफळे यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणी होऊन सबळ परिस्थितिजन्य पुराव्यांअधारे आरोपी शाहीदला दोषी धरले. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार सुनीता गोतरणे, प्रशांत जेऊघाले यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा:

The post नाशिक : एटीएममध्ये चोरी करणार्‍याला मिळाला कारावास appeared first on पुढारी.