Site icon

नाशिक : एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा : डॉ. पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सन 2019 – 20 प्रथम शैक्षणिक वर्षातील एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना आता पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने उपलब्ध करून दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

यासाठी 2019- 20 या काळातील प्रथम वर्ष एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांची भेट घेऊन विनंती केली होती. संबंधित विद्यार्थ्यांना आधीच्या नियमांनुसार पहिल्या चार प्रयत्नांमध्ये त्यांची पहिली व्यावसायिक एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. मात्र 2019-20 या काळात कोविड-19 या आजाराच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात आणि देशात लॉकडाउन असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालये बंद होती. त्यामुळे या काळातील एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नसल्याने त्यांना पाचव्या वेळेस संधी निर्माण करून द्यावी, अशी मागणी ना. डॉ. पवार यांनी केंद्रीय वैद्यकीय आयोगापुढे मांडली होती. याविषयी आयोगाने चर्चा केली. ना. डॉ. पवार यांच्या भूमिकेला मान्यता देत आयोगाने या विद्यार्थ्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी निर्माण करून दिली आहे. यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी मान्यता दिल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळणार असल्याने ना. डॉ. पवार यांनी त्यांचे आभार मानले. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे सहकार्य लाभले असल्याचे ना. डॉ. पवार यांनी सांगितले. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या हजारो विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा : डॉ. पवार appeared first on पुढारी.

Exit mobile version