Site icon

नाशिक : एसटीचे आजपासून सुरक्षितता अभियान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून 11 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत सुरक्षितता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत चालकांचे प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जाणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून अपघातमुक्त सेवा देण्यासाठी एसटीचे चालक कटिबद्ध, असा संदेश दिला जाणार असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

सध्या महाराष्ट्रात एसटीमध्ये सुमारे 24,389 चालक कार्यरत आहेत. अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने एसटीने चालकांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. चालकांना सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच त्यांचे मानसिक संतुलन सुदृढ करण्याच्या दृष्टीने आगार पातळीवर प्रबोधनदेखील करण्यात येत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षांत इतर प्रवासी वाहनांच्या तुलनेत एसटीच्या अपघातांची संख्या कमी आहे. दरम्यान, या सुरक्षितता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ‘प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, वाहतुकीच्या नियमांचे पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मनःस्वास्थ्य’ या चतुसूत्रीचे पालन करीत एसटीच्या चालकांनी यंदाच्या वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेला अपघातविरहित सेवा देण्याचे आवाहन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केले आहे.

लालपरी महाराष्ट्राची लोकवाहिनी
सध्या दररोज सुमारे 40 लाख प्रवाशांना दळणवळणाची सुरक्षित सेवा देणारी लालपरी महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे. गेल्या 75 वर्षांत अविरत आणि सुरक्षित सेवेच्या माध्यमातून प्रवाशांच्या मनात एसटीबद्दल विश्वासार्हतेची भावना निर्माण झाली आहे. या विश्वासाला बळकटी देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळामध्ये दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरक्षितता मोहीम राबविण्यात येते.

हेही वाचा:

The post नाशिक : एसटीचे आजपासून सुरक्षितता अभियान appeared first on पुढारी.

Exit mobile version