नाशिक : एसटीचे तिकीट स्वस्त; ट्रॅव्हल्स मात्र महागच

travel www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये व परराज्यात जाण्यासाठी प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्सला प्राधान्य दिले जाते. सणासुदीच्या काळात विशेषत: दिवाळीत अनेक कुटुंब आपल्या मूळ गावी जात असतात. अशात खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी अवाच्या सव्वा भाडेवाढ केली होती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेदेखील या काळात तिकिटांचे दर वाढविले होते. मात्र 1 नोव्हेंबरपासून ते कमीही केले. परंतु खासगी ट्रॅव्हल्सधारकांनी वाढविलेली भाडेवाढ अद्यापही कमी न केल्याने प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

दिवाळीच्या काळात नाशिकमधून इतर जिल्ह्यात जाणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी दुप्पटीने तिकिटांचे दर वाढविले होते. दिवाळीचा सण असल्यामुळे ग्राहकांनीदेखील यास फारसा विरोध न दर्शविता खासगी वाहतुकीने प्रवास केला. मात्र, दिवाळी होऊनदेखील तिकिटांचे दर कमी होत नसल्याने, आता ग्राहकांकडून विरोधाचा सूर व्यक्त केला जात आहे. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या मनमानी पद्धतीने तिकिटाचे दर आकारून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा आरोप आता प्रवाशांकडून केला जात आहे. नाशिकमधून दररोज मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, जोधपूर, मिरज, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, लातूर, शेगाव, बंगळुरू, गोवा, हैदराबाद, इंदूर, भोपाळ, सुरत, बडोदा, अहमदाबाद, राजकोट या शहरांमध्ये खासगी ट्रॅव्हल्सच्या सेवा सुरू आहेत. विशेष म्हणजे या सर्वच मार्गांवर प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो. दिवाळीच्या काळात तर नाशिकमधून या शहरात जाणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने, प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता ट्रॅव्हल्स कंपन्यांनी भाडेवाढ केली होती. मात्र, ही भाडेवाढ अद्यापही कमी न केल्याने, यावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याची भावना आता प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, यापूर्वीच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खासगी कंपन्यांनी अवाच्या सव्वा भाडेवाढ करू नये असे स्पष्ट केले होते. तसेच ग्राहकांसाठी हेल्पलाइन क्रमांक तसेच ई-मेल आयडीही उपलब्ध करून दिले होते. मात्र, यावर ग्राहकांकडून तक्रारीच केल्या जात नसल्याची बाबही समोर येत असल्याने, कारवाईबाबत प्रादेशिक परिवहन विभाग ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे.

प्रत्येक कंपन्यांचे वेगवेगळे दर…
खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी समान दर कार्यक्रम न राबविता मनमानी पद्धतीने तिकिटाचे दर आकारण्याचा सपाटा लावला आहे. प्रत्येक कंपन्यांकडून वेगवेगळे तिकीट दर आकारले जात असल्याने प्रवाशीही संभ—मात आहेत. ट्रॅव्हल्स कंपन्या प्रवाशांची संख्या विचारात घेऊन दर आकारतात. ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशांची संख्या अधिक असेल अन् मोजक्याच जागा शिल्लक असतील, तर प्रवाशांना जादा पैसे मोजून तिकीट निश्चित करावे लागते. त्यामुळे या कंपन्यांच्या या धोरणाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : एसटीचे तिकीट स्वस्त; ट्रॅव्हल्स मात्र महागच appeared first on पुढारी.