नाशिक : एसटीला वर्षभरानंतर मिळाले पूर्णवेळ विभागीय नियंत्रक

नाशिक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाला तब्बल वर्षभरानंतर पूर्णवेळ नियंत्रक मिळाले. औरंगाबादचे विभागीय नियंत्रक अरुण सिया यांची नाशिकच्या विभागीय नियंत्रकपदी वर्णी लागली. सिया यांनी नुकताच महामंडळाच्या एन. डी. पटेल मार्गावरील कार्यालयात प्रभारी मुकुंद कुंवर यांच्याकडून पदभार स्वीकारला असून, अधिकारी – कर्मचारी वर्गाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.

गेल्या वर्षी एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाचे नियंत्रक नितीन मैंद यांची बदली झाल्यानंतर रिक्तपदावर राजेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. पाटील यांची नियुक्ती औटघटकेची ठरली होती. पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यांतच ते सेवानिवृत्त झाले. ऑगस्ट 2021 पासून विभागीय नियंत्रकपदाची अतिरिक्त जबाबदारी विभागीय कार्यशाळेचे उपयंत्र अभियंता मुकुंद कुंवर यांच्याकडे होती. वर्षभरानंतर अरुण सिया यांच्या रूपाने नाशिकला पूर्णवेळ विभागीय नियंत्रक मिळाले. त्यांनी कुंवर यांच्याकडून महामंडळाचा पदभार स्वीकारत रुजू झाले आहेत. पदभार स्वीकारताना मुकुंद कुवर, वाहतूक नियंत्रक कैलास पाटील उपस्थित होते. दरम्यान, प्रशासकीय बाब म्हणून सिया यांची नाशिकच्या विभाग नियंत्रकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी नाशिक विभागात वाहतूक नियंत्रक म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे.

कुंवर यांची महत्त्वाची भूमिका
एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकपदाची जबाबदारी मुकुंद कुंवर यांच्याकडे असताना कर्मचार्‍यांनी संप पुकारला होता. या काळात एसटीची चाके रुतलेली असतानाही कुंवर यांनी कर्मचार्‍यांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. संपकाळात कुंवर यांनी महत्त्वाची भूमिका बजावत कामगार रुजू करून घेण्यासाठी विशेष परिश्रम घेतले होते.

हेही वाचा:

The post नाशिक : एसटीला वर्षभरानंतर मिळाले पूर्णवेळ विभागीय नियंत्रक appeared first on पुढारी.