नाशिक : एसटी बस, ट्रॅक्टर व पिकअपच्या तिहेरी अपघातात दोन ठार ; तिघे गंभीर

accident,www.pudhari.news

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ठेंगोडा शिवारातील सावकी फाटा परिसरात एसटी बस, ट्रॅक्टर व पिकअपच्या तिहेरी अपघातात भऊर (ता. देवळा) येथील दोघे ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी सटाणा पोलिसांत अपघाताची नोंद झाली असून, एसटी बसचालक रवींद्र संतोष जाधव (रा. पिंपळेश्वर) विरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

या प्रकरणी भाऊसाहेब दौलत पवार (रा. भऊर, ता. देवळा) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. मंगळवारी (दि.१०) रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादीचे चुलतभाऊ रमेश पोपट पवार व त्यांच्यासोबत गावातील सुनील छबू गांगुर्डे, दयाराम दादाजी शिंदे, कृष्णा लक्ष्मण वाघ, दीपक सुभाष पगार हे ट्रॅक्टर (क्रमांक एमएच ४१ एएच ६१९२)ने कऱ्हे येथून देवळ्याकडे येत होते. त्याचवेळी सटाणा आगाराची नंदुरबार-नाशिक बस (क्रमांक एमएच २० बीएल ४२५३) ही नाशिकच्या दिशेने जाताना सावकी फाट्याजवळ ट्रॅक्टरला पाठीमागून धडकली.

यामुळे ट्रॅक्टर रस्त्यावर आडवे झाले आणि समोरून येणारी पिकअप (क्रमांक एमएच १५ एफव्ही८०२६) त्यावर जोरात आदळून ट्रॅक्टर व पिकअप चारीत उलटले. या अपघातात ट्रॅक्टरचालक रमेश पोपट पवार (४४, रा. भऊर) व दयाराम दादाजी शिंदे (२५, रा. भऊर) या दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबतचे सुनील गांगुर्डे, कृष्णा वाघ, दीपक पवार हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक किरण पाटील पुढील तपास करीत असून, अपघातात एसटी व पिकअपमधील काही प्रवासी किरकोळ जखमी आहेत.

हेही वाचा : 

 

The post नाशिक : एसटी बस, ट्रॅक्टर व पिकअपच्या तिहेरी अपघातात दोन ठार ; तिघे गंभीर appeared first on पुढारी.