नाशिक : ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यातील मॉकड्रिल ठरला चेष्टेचा विषय

मॉकड्रील,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सध्या फेब्रुवारीच्या मध्यावरच सूर्य आग ओकत असून, उन्हाच्या चटक्यांनी नागरिक घामाघूम होत असतानाच शासकीय यंत्रणांकडून मात्र, मंगळवारी (दि.२१) केटीएचएम बोटक्लब येथे पावसाळ्यातील पूरपरिस्थितीत बचावासंदर्भातील मॉकड्रिल घेण्यात आले. यंत्रणांच्या या अजब कारभारामुळे उपस्थितांचे चांगलेच मनाेरंजन झाले.

यंदाच्या वर्षी फेब्रुवारीमध्येच उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. एप्रिल-मे महिन्यातील उन्हाची दाहकता आताच जाणवायला लागली आहे. मात्र, एकीकडे उन्हाची दाहकता वाढली असताना शासकीय यंत्रणाकडून पावसाळ्यात उद‌्भवणाऱ्या पूरपरिस्थितीत नागरिकांच्या बचावासंदर्भात रंगीत तालीम (मॉकड्रिल) घेतले. सततच्या पावसामुळे गोदावरी नदीपात्राच्या पाणीपातळीत वाढ झाली. यावेळी गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयाच्या बोटक्लब येथील नदीपात्राच्या दुसऱ्या बाजूला सहा नागरिक अडकून पडले. त्यांना वाचविण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिका, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), शहर पोलिस, ग्रामीण पोलिस दलाचे शीघ्र कृती दल, जिल्हा रुग्णालय, जलसंपदा आदी विभाग बचावकार्यात सहभागी झाले.

केटीएचएम बोटक्लब येथे बचावकार्याप्रसंगी एनडीआरएफची जवान असलेली बोट उलटली. लगेचच तातडीने हालचाली करत त्यातील जवानांना यंत्रणांनी सुखरूप पाण्याबाहेर काढले. एका तासाहून अधिक काळ चाललेले मॉकड्रिल यशस्वी पार पडल्यानंतर शासकीय यंत्रणांनी एकमेकांची पाठ थोपटून घेतली. मात्र, मॉकड्रिलवेळी यंत्रणांमधील असमन्वय प्रकर्षाने पुढे आला. तसेच ऐन उन्हाळ्यात शासकीय यंत्रणांनी राबविलेल्या पूरपरिस्थितीमधील बचावकार्याच्या स्तुतीपेक्षा तो चर्चेचा विषय ठरतानाच यंत्रणांच्या सुपीक डोक्यातून पुढे आलेल्या या संकल्पनेवर हसावे की रडावे, असा प्रश्न अनेकांनी यावेळी उपस्थित केला.

मॉकड्रिल ठरले चेष्टेचा विषय
पावसाळ्यासाठी अद्यापही चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. तत्पूर्वी उन्हाच्या झळांनी अवघी पृथ्वी तप्त हाेणार आहे. त्यामुळे उष्माघात किंवा उन्हाळ्यात घ्यावयाच्या काळजीसंदर्भात मॉकड्रिल घेणे अपेक्षित होते. अथवा दोन दिवसांपूर्वी गुजरात सीमेवर सुरगाण्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याने तेथील जनतेमध्ये भययुक्त वातावरण आहे. अशावेळी भूकंपातील बचावाबाबतचे रंगीत तालीम घेणे उचित ठरले असते. पण शासकीय यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावातून ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याचे मॉकड्रिल घेण्यात आल्याने तो चेष्टेचा विषय बनला.

हेही वाचा : 

The post नाशिक : ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यातील मॉकड्रिल ठरला चेष्टेचा विषय appeared first on पुढारी.