नाशिक : ऑक्सिजन 9, तीव्र न्यूमोनिया, तरीही यशस्वी उपचार

निफाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
ऑक्सिजन पातळी 9, तीव्र न्यूमोनिया, श्वसननलिकेला सूज अशा गंभीर परिस्थितीत डॉक्टरांच्या चमूने केलेल्या यशस्वी उपचारांमुळे एका अडीच वर्षीय चिमुकलीचे प्राण वाचले. ‘डॉक्टरांच्या रूपात देवदूतच भेटले’, अशी भावना चिमुकलीच्या नातेवाइकांनी यावेळी व्यक्त केली.

मुंगसरा येथील शेतकरी कुटुंबातील सिद्धी संजय फडोळ या अडीच वर्षांच्या चिमुकलीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आई-वडिलांनी तिला मातोरी येथील डॉ. संदीप शिंदे यांच्या क्लिनिकमध्ये उपचारासाठी नेले होते. डॉ. शिंदे यांनी तिला तपासले असता, तीव न्यूमोनिया, सूज व श्वसननलिका ब्लॉक होण्याच्या मार्गावर असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी प्राथमिक उपचार करून नाशिक येथील श्रीजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. तिथे पोहोचेपर्यंत चिमुकलीने मान टाकली व ती बेशुद्धावस्थेत गेली होती. परंतु, डॉ. संदीप शिंदे यांचे सहकारी बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर आवारे, छातीरोगतज्ज्ञ डॉ. सागर मोरे, डॉ. विश्वनाथ पाटील, डॉ. संजय गुंजाळ, डॉ. सचिन तांबे, डॉ. दीपक पाटील, डॉ. सुशील शेवाळे आदींच्या चमूने चिमुकलीवर तत्काळ उपचार सुरू केले.

यावेळी ट्यूब टाकून ऑक्सिजननलिका सुरळीत करण्यात आली व कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात आला. तोपर्यंत बाळाची ऑक्सिजन पातळी 9 वर आली होती. त्यानंतर तब्बल 9-10 दिवस आयसीयूमध्ये उपचार केल्यानंतर चिमुकली ठणठणीत बरी झाली. दरम्यान, दवाखान्यात जाण्यास उशीर झाला असता, तर चिमुकलीच्या जिवावर बेतले असते. चिमुकलीचा नवा जन्मच झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

The post नाशिक : ऑक्सिजन 9, तीव्र न्यूमोनिया, तरीही यशस्वी उपचार appeared first on पुढारी.