नाशिक : ‘ऑटो एक्स्पो’मध्ये ८५० युवकांना रोजगार, पालकमंत्र्यांनी दिली भेट

पालकमंत्री दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनतर्फे ठक्कर डोम येथे आयोजित ऑटो ॲण्ड लाॅजेस्टिक एक्स्पो युवकांसाठी रोजगार देणारा ठरत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात हजारो युवकांनी रोजगारासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ८५० युवकांना बाॅश, एबीबी या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. हा आकडा पुढील दोन दिवसांत आणखी वाढणार असून, रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना एक्स्पोच्या माध्यमातून रोजगाराची संधी मिळत आहे.

चारदिवसीय ऑटो ॲण्ड लाॅजेस्टिक एक्स्पोमध्ये सायकलपासून ते जेसीबीपर्यंत वाहने प्रदर्शनात ठेवण्यात आली असून, वाहतूक क्षेत्राचा बदलता प्रवास व आव्हाने याचा पट उलगडण्यात आला आहे. या ठिकाणी बड्या कंपन्यांचे स्टाॅल्स उभारण्यात आले असून, दोन दिवसांत हजारो नाशिककरांनी त्यास भेट देऊन माहिती घेतली. या एक्स्पोचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. आतापर्यंत एक हजारांहून अधिक युवकांनी या ठिकाणी नावनोंदणी केली व त्यापैकी ८५० जणांना नोकरीची संधी मिळाली. पहिल्या दिवशी ५८० जणांना नोकरी मिळाली व ४० युवकांना ऑफर लेटर मिळाले, तर दुसर्‍या दिवशी २६९ युवकांची निवड केली गेली.

महिंद्रा अँड महिंद्रा, बॉश, एम.एस.एल. ड्राइव्ह लाइट, व्ही.आय.पी., डेटा मॅटिक, टपारिया टूल्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, आदित्य बिर्ला कॅपिटल, एम.एन. कॉम्पोनंट या कंपन्यांचा यात सहभाग आहे. दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांनी एक्स्पोला भेट देत असोसिएशनच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी महाराष्ट्र महासंघाचे प्रकाश गवळी, उदय सांगळे, अध्यक्ष राजेंद्र फड, उपाध्यक्ष पी. एम. सैनी, माजी अध्यक्ष जयपाल शर्मा, बाळासाहेब कलशेट्टी, रत्नागिरीचे इम्रान मेमन, सुभाष जांगडा, महेंद्रसिंग राजपूत, शंकर धनावडे, रामभाऊ सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

पाच गाड्यांची विक्री

एक्स्पोमध्ये विविध कंपन्यांच्या मालवाहतूक व इतर वाहनांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. यात पहिल्या दोन दिवसांत अशोक लेलँड आणि टाटा कंपनीच्या एकूण पाच वाहनांची विक्री करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

हेही वाचा :

The post नाशिक : 'ऑटो एक्स्पो'मध्ये ८५० युवकांना रोजगार, पालकमंत्र्यांनी दिली भेट appeared first on पुढारी.