नाशिक: ओझर येथे डॉक्टरांकडून खंडणी मागणाऱ्या तिघांवर गुन्हा

खंडणी

ओझर: पुढारी वृत्तसेवा : येथील बाजारपेठेत असलेल्या श्री. सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी दमबाजी, शिवीगाळ करून डॉक्टराकडे सहा लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले मनसेचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे.

काही महिन्यांपूर्वी स्वाती युवराज बंदरे या उपचारासाठी डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या श्री.सेवा हॉस्पिटल येथे दाखल झाल्या होत्या . महत्वाच्या आरोग्य तपासण्या झाल्यानंतर मेंदूच्या उजव्या बाजूस शस्त्रक्रिया करण्याचे निदान केले. त्यासाठी सुमारे अडीच लाखांचा खर्च अपेक्षित असल्याची पूर्वकल्पना डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. रुग्णाच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने डॉक्टरांनी मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती देत कागदपत्रांची पूर्तता करून जो निधी येईल. त्यावरील फरक नातेवाईक देण्यास राजी झाले. मेंदूची ठरलेली शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर सहायता निधीतून एक लाख रुपये हॉस्पिटलच्या बँक खात्यात जमा झाले. उर्वरित एक लाख बत्तीस हजार रुपये देणे असताना नातेवाईकांनी ६७,५०० रोख स्वरूपात जमा केले. आर्थिक स्थिती बेताची असल्याने उर्वरित रक्कम संचालक डॉ. विश्वनाथ पाटील यांनी उत्तरदायित्व दाखवत आग्रह न धरता रुग्णास घरी सोडले.

नातेवाईकांनी देखील डॉक्टरांचे आभार मानत सत्कारही केला. काही दिवसांनंतर रुग्णाचे जावई म्हणून योगेश नाना पाटील व जयेश वासुदेव ढिकले आणि एक अनोळखी असे तिघांनी डॉक्टरांच्या केबिनमध्ये येत तुम्ही स्वाती बंदरे रुग्णाबाबत सहायता निधी येऊनही पेशंट कडून रोख रक्कम का घेतली ? असा जाब विचारला. त्यावर डॉ.विश्वनाथ पाटील यांनी नातेवाईकांना सांगितलेली सर्व हकीकत पुन्हा जावई म्हणून योगेश पाटील याला सांगितली. परंतु योगेश नाना पाटील हा ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने तू हॉस्पिटल कसे चालवतो बघून घेतो, म्हणत दमबाजी करत शिवीगाळ केली.

दुसऱ्यादिवशी डॉ.पाटील यांनी पुन्हा योगेश यास समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी विषय थांबवायचा असेल तर रुग्णाचे घेतलेले पैसे परत करा आणि आम्हाला सहा लाख रुपये द्या अन्यथा आम्ही सोशल मीडियावर तुमची बदनामी करू असे सांगत थेट खंडणीची मागणी केली. यावर विश्वनाथ पाटील यांनी अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्नही केला. पण तिघांची दमबाजी देऊन रक्कम मागणी सुरूच असल्याने जेरीस आलेल्या रुग्णालय प्रशासनाने मुख्यमंत्री सहायता निधीची आलेली रक्कम देखील परत शासनास पाठवून दिली. नंतर प्रकरणात कुठलेही तथ्य उरलेले नसताना तिघांनी खंडणीची मागणी सतत सुरू ठेवली. अखेरीस खंडणी रक्कम देण्यास डॉ.पाटील यांनी नकार देताच तिघांनी सोशल मीडियावर बदनामी सुरू करत स्टंटबाजी केली.

अखेर डॉ.विश्वनाथ पाटील यांच्यासह ओझरच्या डॉक्टरांनी अपर पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन ओझर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात योगेश नाना पाटील, जयेश वासुदेव ढिकले आणि अन्य एक अशा तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल दिनकर वाघेरे करत आहे.

दोघे मनसेचे पदाधिकारी

योगेश नाना पाटील आणि जयेश वासुदेव ढिकले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असल्याचे बोलले जाते. योगेश नाना पाटील याने मागील काळात रोलेट विरोधात अशीच स्टंटबाजी सोशल मीडियावर केली होती. योगेश पाटील आणि जयेश ढिकले दोघेही मनसेचे निफाड तालुक्यातील पदाधिकारी असल्याची चर्चा आहे. तीही बाब फिर्यादी डॉ. विश्वनाथ पाटील यांनी निदर्शनास आणून दिली असता वर गेले तर वीस लाख लागतील आम्हला सहा लाख द्या आणि विषय संपवा म्हणत मागणी सुरू ठेवली. परंतु मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पाटील आणि ढिकले यांच्यावर कारवाई करण्याचे सांगत पक्ष याबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले.

हेही वाचा