Site icon

नाशिक : कच्च्या तेलाच्या किमती कमी, तरीही पेट्रोलचे दर जैसे थे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

या वर्षाच्या प्रारंभी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार झाल्याचे बघावयास मिळाल्याने वाहनधारक धास्तावले होते. पेट्रोलचा दर १२१ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचल्याने सर्वत्रच संताप व्यक्त केला गेला. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने इंधनाच्या दरावरील कर कमी करून वाहनधारकांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, दर जैसे थे असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सातत्याने इंधनाच्या किमतींमधील चढउतारामुळे वाहनधारक त्रस्त झाले होते. मात्र, प्रथमच गेल्या पाच महिन्यांपासून किमतींमध्ये कुठल्याही प्रकारचा चढउतार न झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बुधवारी (दि.९) डब्ल्यूटीआय क्रूड प्रतिबॅरल ८८.७२ डॉलरवर पोहोचले असून, त्याचवेळी ब्रेंट क्रूड प्रतिबॅरल ९५.३६ वर पोहोचले आहे. ओपेक देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केल्याची घोषणा केल्याने कच्च्या तेलाच्या दरात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे तेल कंपन्यांनी १ नोव्हेंबरपासूनच तेलात प्रतिलिटर ४० पैसे सवलत देणे अपेक्षित होते. मात्र, कंपन्यांनी तसे केल्याचे अद्यापही दिसून येत नाही. वास्तविक कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने, पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी होणे अपेक्षित होते. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल २२ मे रोजी झाला होता. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. केंद्र आणि राज्य सरकारने २२ मे रोजी उत्पादन शुल्कात कपात केली होती. दरम्यान, गुजरातसह इतर राज्यांच्या निवडणुका असल्याने त्या-त्या राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी केल्या जाण्याची शक्यता आहे. अशात त्याचा लाभ महाराष्ट्रालाही होणार काय? हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

१० पैशांनी कमी दर…

कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने काही राज्यांमध्ये पेट्रोल १० पैशांनी स्वस्त झाले. ऑगस्टमध्येच या किमती कमी केल्या गेल्या. मात्र, महाराष्ट्रात अजूनही किमतीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला गेला नाही. नाशिकमध्ये सध्या पेट्रोलचा दर १०६ रुपये ८३ पैसे प्रतिलिटर इतका आहे. तर रिलायन्ससह इतर खासगी कंपन्यांच्या पेट्रोलपंपांवर हा दर अधिक आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कच्च्या तेलाच्या किमती कमी, तरीही पेट्रोलचे दर जैसे थे appeared first on पुढारी.

Exit mobile version