
नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा
येवला तालुक्याची दुष्काळी तालुका अशी ओळख असली तरी ३८ गाव पाणीपुरवठा योजनेमुळे ६२ गावांसह वाडी- वस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. पण उर्वरित १९ गांवाचा पाणीपुरवठा प्रश्न प्रलंबित आहे. या १९ गावांसह १२ वाडी-वस्त्यांची तहान सध्या टॅंकरद्वारे भागविली जात आहे.
गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने यावर्षी विहिरींच्या सरासरी पाण्याची पातळी चांगली राहिल्याने मार्चच्या मध्यापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागली नाही. आता मात्र तालुक्यात टंचाईची दाहकता जाणवू लागली आहे. जसजशी उन्हाची तीव्रता वाढू लागली तसतशी टंचाईग्रस्त गावांची, वाडी-वस्त्यांची संख्याही वाढू लागली आहे. एप्रिलच्या अखेरीस सुमारे १९ गावांसह १२ वाडी-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने या गावांमध्ये १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. शासनाने तालुक्यातील अनेक गावांमध्ये राबवलेल्या पाणीयोजना आता पाण्याअभावी कुचकामी ठरल्या आहेत. किंबहूना जलस्रोत आटल्याने पाणीयोजनांसह हातपंपांनीही माना टाकल्याचे चित्र आहे. उत्तर-पूर्व भागातील भूजल पातळीत मोठी घट झाल्याने दिवसेंदिवस टंचाईची दाहकता अजूनच वाढत आहे. तालुक्यात ३८ गाव पाणीपुरवठा योजनेचे ६२ वर गावे टँकरमुक्त झाली आहेत. याच धर्तीवर उत्तर-पूर्व भागासाठीदेखील प्रभावी व यशस्वी योजना राबविण्याची अपेक्षा वर्षानुवर्षे व्यक्त होत आहे. येवला पंचायत समितीकडे टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेल्या गावांमध्ये आहेरवाडी, जायदरे, रेंडाळे, चांदगाव, ममदापूर (ममदापूर तांडा), खरवंडी, देवदरी, वसंतनगर, अनकाई (भगत वस्ती चव्हाण वस्ती), गोरखनगर (मोरे वस्ती, बोराडे वस्ती), अनकाई (जाधव वस्ती, वाघ वस्ती), सायगाव (महादेववाडी), नगरसूल (निलक वस्ती, महालगाव, कोतकर, येवले, जाधव, भानगडे वस्ती), लहीत, हडप सावरगाव, पांजरवाडी, पिंपळखुटे बुद्रुक (पगारे वस्ती, पाणलोट वस्ती), भुलेगाव, कासारखेडे, कोळगाव, वाईबोथी, कोळम खुर्द, कोळम बुद्रुक, आडसुरेगाव, गारखेडे या गावासह वाडी-वस्त्यांवर १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. याशिवाय पंचायत समितीकडे पाच गावे व वाड्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
सामूहिक पाहणी करून मंजुरीसाठी प्रांताधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविले जात आहेत. पाणीपुरवठा मंजुरीचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आल्याने लवकर पाणी मिळणे शक्य होणार आहे. दुष्काळी तालुक्यांच्या यादीत येवला तालुका वरच्या स्थानावर आहे. शेतीसाठी जवळपास अर्धा तालुक्याला पालखेड डावा कालव्याचे पाणी मिळत आहे. येवला तालुका हा अवर्षणप्रवण व डोंगराळी भाग असल्याने येथे कितीही पाऊस झाला; तरी तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागाला टंचाईची दाहकता दरवर्षी जाणवते. उत्तर-पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या झाल्या आहेत, तर मागील महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने डोके वर काढले आहे.
हेही वाचा:
- Sharad Pawar Resign : शरद पवार यांच्याकडे भविष्याची योजना असेल – तारिक अन्वर
- अजित पवार यांच्यामुळेच शिवसेना फुटली : रामदास कदमांचा घणाघात
- शरद पवार: ‘जिथे आमचा देव नाही, तिथे आमचा नमस्कारही नाही’ म्हणत राष्ट्रवादी पुणे पदाधिकार्यांचा राजीनाम्याचा इशारा
The post नाशिक : कडक उन्हाळ्यात टॅंकरचा आधार; भागवतेय १९ गावे अन् १२ वाडीवस्त्यांची तहान appeared first on पुढारी.