नाशिक : कमर्शिअल इमारतींचे ऑडिट नाहीच, मनपा’च्या पत्राचा महावितरण’ला विसर

महावितरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील शासकीय आस्थापनांबरोबरच मॉल्स, दुकाने, व्यावसायिक इमारतींचे इलेक्ट्रिक ऑडिट करून घेण्याबाबत मनपाने दिलेल्या पत्राचा विसर महावितरण कंपनीला पडला आहे. यासंदर्भात मनपाने पत्र देऊन महावितरणने तीन महिन्यांत कुठलाही प्रतिसाद दिला नसल्याने शहरात कमर्शिअल इमारतींमध्ये शॉर्टसर्किटने दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहरातील गंजमाळ या भागातील मास्टर मॉलला तीन महिन्यांपूर्वीच शार्टसर्किटमुळे आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे इलेक्ट्रिकल ऑडिटचा मुद्दा चर्चेत आला. शिवाय अनधिकृत बांधकामही समोर आले होते. तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी या मॉलच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यावर मॉलचे बांधकामच अनधिकृत असल्याचे उघड झाले होते. हॉलच्या जागेचा वापर गोडाऊनसाठी करण्यात येत होता. याआधी महात्मा गांधी रोडवरील बेसमेंटमध्ये संगणक विक्री करणार्‍या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली होती. महापालिका क्षेत्रात जवळपास एक लाखाहून अधिक जुन्या व्यावसायिक मिळकती आहेत. या ठिकाणी 20 ते 30 वर्षांपूर्वी जुनी विद्युत व्यवस्था असल्याने तसेच अनेक ठिकाणी जुन्या वीजवाहक तारा असल्यामुळे शॉर्टसर्किटची भीती आहे. ही बाब लक्षात घेत महापालिकेने फायर ऑडिटच्या धर्तीवर इलेक्ट्रिकल ऑडिट करून घेण्याचे आदेश दिले आहेत.

इलेक्ट्रिकल ऑडिट करून घेण्यासाठी महावितरण कंपनीमार्फत पुढील प्रक्रिया राबविली जाणे अपेक्षित होते. त्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाने महावितरणला पत्र पाठवत यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली होती.

अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना करण्याबरोबरच शहरातील मोठ्या व्यावसायिक व रहिवासी इमारतींचे इलेक्ट्रिकल ऑडिट करण्यासंदर्भात तज्ज्ञ सल्लागार नियुक्तीबाबत महावितरणला पत्र देण्यात आले होते. मात्र महावितरणकडून कुठलाही प्रतिसाद आलेला नाही.
– संजय बैरागी, प्रमुख अग्निशमन अधिकारी

हेही वाचा :

The post नाशिक : कमर्शिअल इमारतींचे ऑडिट नाहीच, मनपा'च्या पत्राचा महावितरण'ला विसर appeared first on पुढारी.