नाशिक : कमी ग्रेडचा कांदा खरेदीची विनंती नाफेडला करणार : दादा भुसे

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शेतकऱ्यांकडून ४५ एमएमपेक्षा कमी ग्रेडचा कांदा खरेदीसाठी नाफेडला विनंती करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. कांदा उत्पादकांना मिळणारा दर अत्यल्प आहे. त्यामुळे नाफेडद्वारे हस्तक्षेप योजना राबवून कांद्याचे दर वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ना. भुसे हे शुक्रवारी (दि. १०) नाशिकमध्ये आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कांद्याला कमी दर मिळत आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नाफेडच्या माध्यमातून सव्वा लाख टन कांदा खरेदीचे लक्ष्य असून खरेदी प्रगतिपथावर असल्याचे ना. भुसे यांनी सांगितले. नाफेडच्या खरेदीमुळे आठ दिवसांत कांद्याच्या दरात क्विंटलमागे 150 ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांना क्विंटलला ४०० ते ८०० रुपये दर मिळत असल्याचे ना. भुसे म्हणाले.

नाशिकसह अन्य जिल्ह्यांत कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. त्यात बांगलादेश व पाकिस्तानामध्ये कांदा निर्यात कमी झाली आहे. यासर्वांचा परिणाम कांदा दर घसरण्यामागे असल्याचे ना. भुसे यांनी सांगितले. नाफेडबाबत तक्रारी येत असून शेतकऱ्यांनी मागणी केल्यास त्यांची चाैकशी करू, असे आश्वासन ना. भुसे यांनी दिले. कांदा खरेदीदार कंपन्या या व्यापाऱ्यांच्या असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. याबाबत तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही ना. भुसे यांनी दिली.

कांद्यावर राजकारण नको : भुसे

कांदा प्रश्नावर राजकारण नको, तर यावर विचार होऊन मार्ग शोधला पाहिजे, असे मत ना. दादा भुसे यांनी व्यक्त केले. मुंबईत द्राक्ष शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी चर्चा झाली असून त्यांना व्यवस्था करून दिल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरमधील नामांतर आंदोलनावर बोलताना आंदोलकांची कीव येत आहे. ज्यांनी आपल्या मंदिरांची व महिलांची विटंबना केली, त्यांचे नाव मिटवण्यात आले. त्यामुळे नामांतरांचे स्वागत करायला हवे होते, असाही टोला ना. भुसे यांनी एमआयएमला लगावला.

हेही वाचा :

The post नाशिक : कमी ग्रेडचा कांदा खरेदीची विनंती नाफेडला करणार : दादा भुसे appeared first on पुढारी.