नाशिक : करवसुलीसाठी महापालिकेचे ‘वॉरंट अस्त्र’

नाशिक मनपा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

करवसुलीसाठी महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. ग्राहकांना सवलती देण्याबरोबरच कर बुडविणाऱ्यांना वॉरंटही बजावले जात आहे. आतापर्यंत ३७९ धेंडांना मालमत्ता जप्तीचे वाॅरंट बजावले असून, त्यातील १८८ थकबाकीदार वठणीवर आल्याने ‘वॉरंट अस्त्र’ चांगलेच प्रभावी ठरताना दिसून येत आहे. कारण वॉरंट बजावताच साडेनऊ कोटींचा भरणार करण्यात आला आहे. अजूनही 200 थकबाकीदारांनी सहकार्य केले नसल्याने त्यांच्या मालमत्तांवरील लिलावाची टाच कायम आहे.

महापालिका करसंकलन विभागाने मागील आर्थिक वर्षात रेकाॅर्डब्रेक वसुली करत १८८ कोटी मालमत्ताकर संकलन केले. पण त्यासाठी करसंकलन विभागाची मोठी दमछाक झाली होती. थकबाकी वसुलीसाठी गतवेळेस दिवाळीपुर्वीच ढोल बजाओ मोहीम हाती घ्यावी लागली होती. मोठ्या थकबाकीदारांच्या निवास, कार्यालये यांपुढे ढोल वाजवत वसुलीची आठवण करून देण्यात आली. नामुष्की टाळण्यासाठी अनेकांनी थकबाकी भरणे पसंत केले. त्यानंतर मोठ्या थकबाकीदारांना स्मरण पत्रे पाठवली. त्या माध्यमातून 15 कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले. या दोन्ही अस्त्रांना काही करबुडव्यांनी जुमानलेले नाही. त्यांना वठणीवर आणण्यासाठी महापालिका करसंकलन विभागाने तब्बल 300 हून अधिक मोठ्या थकबाकीदारांना कर भरा अन्यथा मालमत्ता जप्त करू, असे वाॅरंट धाडले आहे.

३१ मार्चनंतर मनपाने वाॅरंट बजावलेल्या थकबाकीदारांच्या मालमत्ता लिलावासाठी जप्तीचे मूल्यांकन प्रक्रियेला सुरुवात केली असून, ६१ मालमत्तांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मनपा मालमत्तेवर टाच अ‍ाणेल, या भीतीने १८८ वाॅरंट बजावलेल्या थकबाकीदारांनी तब्बल साडेनऊ कोटींचा भरणा केल‍ा आहे, तर उर्वरित थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी सहकार्याची भूमिका दर्शवली आहे. दरम्यान, महापालिकेचे वॉरंट अस्त्र चांगलेच प्रभावी ठरत असून, आतापर्यंत त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : करवसुलीसाठी महापालिकेचे 'वॉरंट अस्त्र' appeared first on पुढारी.