Site icon

नाशिक : कर्तव्यदक्ष सुरक्षारक्षकांमुळे महिलेला मिळाले हरवलेले पाकीट

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

सप्तशृंगीगडावरील रोप वे ट्रॉलीवर भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षक चेतन ठाकूर (बाउन्सर) यांनी विठाबाई रघुनाथ सांगोळे (वय ६०, रा. कल्याण) या महिलेचे हरविलेले पैशांचे पाकीट सापडवून दिले.

रोप वे ट्रॉलीत जाताना पाकीट गहाळ झाल्याची तक्रार महिलेने केल्यानंतर चेतन ठाकूर व सुनील चव्हाण या सुरक्षारक्षकांनी लागलीच रोप वे ट्रॉलीत असलेल्या सीसी टीव्हीच्या माध्यमातून तपास करीत ते पाकीट कुणाला सापडले का याचा शोध घेतला. एका महिला भाविकाने ते पाकीट उचलल्याचे सीसीटीव्हीच्या व्हिडिओमध्ये दिसून आले. त्या महिलेचा फोटो मोबाइलवर काढून सर्वत्र शोध घेण्यात आला. दोन तासांनंतर ज्या महिलेला पाकीट सापडलेले होते ती महिला सापडली. त्यांना चेतन ठाकूर यांनी मोबाइलवरील सीसीटीव्हीत त्यांचा पाकिटासहित फोटो दाखवला व ते पाकीट परत घेतले. ठाकूर व चव्हाण यांनी विठाबाई रघुनाथ सांगोळे यांना ते पाकीट परत केले. या पाकिटात सात हजार रुपये होते. ठाकूर व चव्हाण यांच्या कार्यतत्परतेबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा :

The post नाशिक : कर्तव्यदक्ष सुरक्षारक्षकांमुळे महिलेला मिळाले हरवलेले पाकीट appeared first on पुढारी.

Exit mobile version