
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा शासकीय रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अपुर्या स्वच्छता कर्मचार्यांमुळे अस्वच्छता पसरल्याचे बोलले जाते. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साहेबांच्या शासकीय बंगल्यावर पाच पुरुष व दोन महिला स्वच्छता कर्मचारी काम करीत असल्याने बंगला स्वच्छ आणि रुग्णालय अस्वच्छ, असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हाभरातून व परजिल्ह्यातूनही गरजू रुग्ण उपचारासाठी येत असतात. दररोज शेकडो रुग्ण व नातलगांचा वावर रुग्णालय परिसरात असल्याने येथील परिसर स्वच्छ असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक दिवसांपासून वरिष्ठांचे दुर्लक्ष व अपुर्या स्वच्छता कर्मचार्यांमुळे रुग्णालयीन परिसरातील अस्वच्छता वाढली आहे. एकीकडे रुग्णालय परिसरातील रस्ते नादुरुस्त झाल्याने रुग्णांसह नातलगांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे. तर दुसरीकडे परिसरातील नाल्यांमध्ये उपचारादरम्यान वापरलेले मास्क, ग्लोव्हज, कपडे आदी साहित्य आढळून येत आहे. ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहेत. काही दिवसांपूर्वी मनपा प्रशासनानेही जिल्हा रुग्णालयास नोटीस बजावत डास उत्पत्ती होत असल्याने स्वच्छता करण्यास सांगितले होते. मात्र, तरीदेखील रुग्णालयात स्वच्छता झालेली दिसत नाही. अपुर्या कर्मचार्यांमुळे स्वच्छता होत नसल्याचा दावा केला जात आहे. मात्र, कंत्राटी कर्मचार्यांना साहेबांच्या बंगल्यावर पाठवल्याने तसेच स्वच्छता निरीक्षकांनाही अतिरिक्त कामाची जबाबदारी दिल्याने स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.
साहेबांच्या बंगल्यावर कर्मचारी ठेवलेले नाहीत. कर्मचारी काढून घेतले आहेत. त्याचप्रमाणे रुग्णालयातील दुरुस्तीच्या कामांचा प्रस्ताव पाठवला असून, त्यास मंजुरी मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग काम सुरू करेल. प्रशिक्षणार्थी डॉक्टर, परिचारिकांकडून ग्लोव्हज, मास्क टाकले जातात. आम्ही दररोज स्वच्छ करतो. – पद्माकर नेहते, स्वच्छता निरीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालय.
हेही वाचा:
- पिंपरी : राष्ट्रवादी कामगार सेलच्या अध्यक्षाला अटक
- मी काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच नाही : आ. पृथ्वीराज चव्हाण
- नाशिक : श्वान निर्बीजीकरणाचा ठेका रद्द करण्याचा मनपा आयुक्तांचा इशारा
The post नाशिक : कर्मचारी साहेबांच्या बंगल्यावर अन् ‘सिव्हिल’ची स्वच्छता वार्यावर! appeared first on पुढारी.