नाशिक : कहांडळवाडीत एका रात्री तीन घरफोड्या

घरफोडी www.pudhari.news

नाशिक (वावी)  : पुढारी वृत्तसेवा
कहांडळवाडी परिसरात तीन ठिकाणी चोरट्यांनी घरफोड्या करत 72 हजार रुपये रोख, तीन अ‍ॅण्ड्रॉइड फोन व एका ठिकाणी लहान मुलांचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी (दि.21) मध्यरात्री घडली.

भास्कर भाऊसाहेब कोकणे यांचे जिल्हा परिषद शाळेजवळ घर आहे. रात्री एक ते अडीचच्या दरम्यान कोकणे यांच्या घराचा दरवाजा उघडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील माणसे झोपेत असल्याने याबाबतचा सुगावा कुणालाही लागला नाही. चोरट्यांनी या ठिकाणी दोन अ‍ॅण्ड्रॉइड फोन, दोन चांदीच्या तोळबंद व कपाटात ठेवलेली 48 हजार रुपये रोख रक्कम लांबवली. भाजीपाला विक्रीसाठी मार्केटला गेलेली कोकणे यांची जीप अडीचच्या सुमारास घरी आल्यावर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. दुसर्‍या घटनेत तुकाराम चांगदेव उगले यांच्या वस्तीवर घराचा मागील सिमेंटचा दरवाजा तोडून पहाटे चारच्या सुमारास चोरट्यांनी आत प्रवेश केला. उगले यांच्या भिंतीला टांगलेल्या पॅन्टच्या खिशातून वीस हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी काढून घेतली. घरातील पेटी उचलून बाहेर नेत शेजारच्या भोपळ्याच्या शेतात नेऊन उचकपाचक केली. या पेटीत लहान मुलांचे सोने-चांदीचे दागिने असल्याचे उगले यांनी सांगितले. पेटीत फारसे घबाड हाती न लागल्याने चोरटे पुन्हा घरात शिरले व लोखंडी कपाट उघडण्याचा प्रयत्न केला. या आवाजाने घरातील महिलेला जाग आल्यावर त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे चोरट्यांनी वावी रस्त्याकडे पळ काढला. 25 ते 30 वयोगटातील दोन चोरटे असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांनी अंगात टी-शर्ट व नाइट पॅन्ट घातलेली होती व तोंड कानटोपीने झाकलेले होते. चोरीचा तिसरा प्रकार बाबासाहेब दगडू ढवळे यांच्या वस्तीवर घडला. चोरट्यांनी घराच्या पडवीतील कपाटाची उचकपाचक करून चार हजार रुपये रोकड व एक अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल लंपास केला. पहाटे पाच वाजता घरातील माणसे उठल्यावर चोरीचा प्रकार लक्षात आला. कोकणे यांच्या घरी मध्यरात्री चोरी झाल्याचा प्रकार समजल्यावर गावातील तरुणांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. मात्र, चोरटे पसार झाले होते.

ग्रामस्थ कीर्तनात दंग :

गावात सप्ताह सुरू असल्याने रात्रभर मंदिरात लोक जागे असतात. वस्त्यांवरील महिला-पुरुष कीर्तनाच्या निमित्ताने उशिरापर्यंत घरी जातात. गावात चोरीच्या घटना घडल्यामुळे सर्वांमध्ये घबराट पसरली आहे. संबंधित चोरटे नाइट पॅन्टवर चोरी करण्याच्या उद्देशाने असल्याने कदाचित ते याच परिसरातले असावे, असा अंदाज कहांडळवाडी ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्री फिरणार्‍या तरुणांना अडवून त्यांची शहानिशा करणे गरजेचे आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कहांडळवाडीत एका रात्री तीन घरफोड्या appeared first on पुढारी.