नाशिक : कांदा घसरणीवरून ना. भारती पवार यांना घेराव

lasalgaon www.pudhari.news

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यातील शिरसगावला जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना घसरलेल्या कांदा दरावरून शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी घेराव घातला. कांदादरावरून त्यांना शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. नाफेडमार्फत सुरू असलेली कांदा खरेदी भाव पाडण्यासाठीच असून, सरकार याप्रश्नी चालढकल करत असल्याचा आरोप करीत पदाधिकार्‍यांसह शेतकर्‍यांनी घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली.

नाफेड काहीच कामाचे नसल्याचे सांगताच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचा संताप अनावर झाला. शेतकरी संघटनेने लेखी द्यावे, आम्ही नाफेडची खरेदी बंद करू, असे त्यांनी सुनावले. वादावादीमुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे नेते अर्जुन बोराडे, रामकृष्ण बोबले, भीमराव बोराडे, नवनाथ कदम, सुकदेव पगोरे, तानाजी बोराडे, भाऊसाहेब भंडारे, हरिभाऊ मोगल यांसह शेतकर्‍यांनी कोसळलेल्या कांद्याच्या दराबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांना घेरले. जागतिक पातळीवर जे भाव आहेत, त्या भावाने येथे कांदा खरेदी करा, अशी जोरदार मागणी संतप्त शेतकर्‍यांनी केली. शेतकर्‍यांच्या मागणीवर भारती पवार म्हणाल्या की, नाफेडची खरेदी करण्यासाठी आपणच केंद्र सरकारकडे आग्रह केला. तुम्ही त्याला विरोध करत आहात. आजपर्यंत सरकार लाल कांदा खरेदी करत नव्हते. आता तो आम्ही खरेदी करत आहोत. जागतिक पातळीवर मागणी नाही. लाल कांदा हा लवकर खराब होतो. नाफेड काही कामाचं नाही, असे शेतकरी संघटनेने निवेदन दिल्यास आम्ही नाफेडची खरेदी बंद करू, असे जोरदार प्रत्युत्तर डॉ. पवार यांनी दिले. शेतकरी संघटनेचे काम अतिशय चांगलं चालू आहे. शेतकर्‍यांना न्याय देण्याच्या हेतूने ते काम करतात. परंतु शेतकर्‍यांचा कांदा घेऊन समुद्रात बुडवा या संघटनेच्या वक्तव्याचे मी निषेध करते. समुद्रात फेकण्यासाठी देशातला शेतकरी राब राब कष्ट करत नाही. आज भारत पुढे चालला असून, त्याला दिशा द्यायची आहे. जर आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर अशा पद्धतीचे वक्तव्य करत शेतकर्‍यांचा अपमान होणार असेल तर आपण याचा निषेध करते. शेतकर्‍यांच्या मदतीसाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करते. परंतु उगीच चुकीचे आरोप करून नाफेडसारख्या यंत्रणेला शेतकर्‍यांच्या मदतीपासून वंचित करू नका, असे आवाहन डॉ. पवार यांनी शेतकरी संघटनेला केले.

‘नाफेड’मुळे कांदादरात सुधारणा : नाफेडच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कांदा खरेदीमुळे कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाली असून, नाफेडची खरेदी सुरू होण्यापूर्वी कांदा 450 रुपये दराने विक्री केला होता, तोच कांदा आता क्विंटलला 950 रुपये दराने विक्री झाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला.

कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने कांदा उत्पादकांना सावरण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करण्यात आली असताना नाफेड कांद्याची खरेदी करत नसल्याचे चुकीचे संदेश शेतकर्‍यांपर्यंत काही घटक पोहोचवत असल्याचा दावा डॉ. पवार यांनी केला. गेल्या दोन महिन्यांत शेतकर्‍यांनी विक्री केलेल्या कांद्यास अनुदान देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. मात्र, हा विषय राज्य शासनाच्या अखत्यारितील असून, त्यावरदेखील लवकरच निर्णय घेण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास डॉ. पवार यांनी व्यक्त केला. लासलगावात रविवारी (दि. 5) नाफेडच्या वतीने शेतकरी प्रोड्युसर कंपनीने सुरुवात केलेल्या कांदा खरेदीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या अचानक आल्या होत्या. त्यांनी यावेळी काही शेतकर्‍यांशी संवाद साधला. माजी जि. प. सदस्य डी. के. जगताप, बाजार समितीमाजी सभापती सुवर्णा जगताप, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण कदम उपस्थित होते. माझा मतदारसंघ मुळात कांद्याचा निर्माता आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून जी जी मदत शक्य आहे तेथे करण्यासाठी आपण काम करत आहे. नाफेड व्यापार्‍यांकडून कांदा खरेदी करते,असा आरोप भुजबळ यांनी केला आहे. परंतु भुजबळ यांनी नाफेडच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा करावी. नाफेड मुळात केंद्र सरकारची योजना आहे आणि तिच्या माध्यमातून कांदा खरेदी होते. नाफेड फक्त शेतकर्‍यांकडून कांदा खरेदी करते, असा दावा डॉ. भारती पवार यांनी वारंवार केला. कांदा खरेदीसाठी काही पद्धत आहे. नाफेडकडे एवढी यंत्रणा नाही की ती प्रत्येक बाजार समितीत जाऊन खरेदी करेल. परंतु नाफेडने फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातूनही खरेदी सुरू केली असल्याचा दावा करत डॉ. भारती पवार यांनी करत नाफेडबाबच निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.

‘फार्मर कंपन्यांनी मैदानात उतरावे’ : नाफेड या संस्थेकडे सक्षम यंत्रणा नसतानादेखील शेतकरी हितासाठी शेतकरी फार्मर कंपन्यांमार्फत कांदा खरेदी सुरू केली आहे. परंतु या कंपन्यांनी थेट शेतकर्‍यांकडून कांदा खरेदी न करता बाजार समितीमध्ये लिलाव प्रक्रियेत सहभाग घेऊन तो कांदा खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी निवृत्ती न्याहारकर व खडक माळेगावचे उपसरपंच विकास रायते यांनी केली. अशा कंपन्या खरेदीला बाजार समितीत उतरल्यास स्पर्धा निर्माण होऊन शेतकर्‍यांचा फायदा होऊ शकतो, याकडे या शेतकर्‍यांनी लक्ष वेधले.

आकडा बघा.. 2400 मेट्रिक टन खरेदी : नाफेडकडे प्रत्येक बाजार समितीत जाऊन कांदा खरेदी करण्याएवढी यंत्रणा नाही. नाफेडने फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून खरेदी सुरू केली आहे. आकडा बघितला तर जवळपास 2400 मेट्रिक टन कांद्याची खरेदी नाफेडने केली आहे. आपल्या जिल्ह्यातून जवळपास 677 शेतकर्‍यांचा कांदा नाफेडच्या माध्यमातून खरेदी झाला असून, त्याची माहिती नाफेडकडे आहे. विरोधकांनी दिशाभूल करू नये, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले.

हेही वाचा:

The post नाशिक : कांदा घसरणीवरून ना. भारती पवार यांना घेराव appeared first on पुढारी.