नाशिक : कांदा शेतीला प्रक्रिया उद्योगाची गरज

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव हे देशातील पहिल्या क्रमांकाचे कांदा पिकविणारे म्हणून आशिया खंडात प्रचलित आहे. मात्र, प्रक्रिया उद्योगाची वानवा असल्याने शेती, शेतकरी आणि रोजगाराच्या संधी हिरावल्या जात आहेत. याकरिता कांदा शेतीला प्रक्रिया उद्योगाची गरज असून, त्याद्वारे कांदा उत्पादकांना पर्यायी उत्पन्नाचा मार्ग सुरू होईल.

नाशिक जिल्ह्यामध्ये १६ कृषी उत्पन्न बाजार समित्या असून, यामध्ये लासलगाव, पिंपळगाव बसवंत बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वर्षभर कांद्याची विक्री होत असते. लासलगावच्या कांद्याला चव आणि गुणवत्ता असल्याने परदेशात या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. विपुल उत्पादनामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तर कमी उत्पादनामुळे ग्राहकांच्या डोळ्यात अश्रू काढणारा कांदा नेहमीच चर्चेत राहतो. नाशिक जिल्ह्यातून देशाची गरज भागवून कांदा मोठ्या प्रमाणात निर्यातही केला जातो, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊनही जिल्ह्यामध्ये बोटावर मोजण्याइतकेच प्रक्रिया उद्योग असल्याचे दिसून आले आहे. देशामध्ये कांदा कच्च्या स्वरूपात खाल्ला जात असला तरी परदेशात मात्र प्रक्रिया केलेलाच कांदा खाल्ला जातो. म्हणून प्रक्रिया केलेल्या कांद्याला देशांतर्गत तसेच देेशाबाहेरही मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. कांद्यावर प्रक्रिया करून तयार केलेल्या पदार्थांची विक्री केल्यास साठवणुकीत आणि वाहतुकीत होणारे कांद्याचे नुकसान टाळता येईल. परदेशात कांद्याची पावडर आणि निर्जलीकरण केलेल्या कांद्यांच्या चकत्यांना मोठी मागणी आहे, सध्या त्यांची निर्यात जपान, मलाया, पूर्व आफ्रिका, इंग्लंड, श्रीलंका, हाँगकाँग, जर्मनी इत्यादी देशांमध्ये होत आहे.

४० टक्के कांदा नाशिक जिल्ह्यातूनच
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील हवामान वर्षभर कांदा लागवडीस पोषक असते. महाराष्ट्रातील ४० टक्के कांदा क्षेत्र हे एकट्या नाशिक जिल्ह्यात असून, प्रामुख्याने पुणे, धुळे, अहमदनगर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये कांदा पीक घेतले जाते. कांदा पिकाच्या प्रतिहेक्टरी आणि एकूण उत्पादनाबाबत अनेक विक्रम शेतकर्‍यांनी नोंदविलेले असले तरी कांदा साठवणुकीबाबत परिस्थिती फारशी समाधानी नाही. सद्यस्थितीचा विचार करता ३० ते ४० टक्क्यांपर्यंत अयोग्य साठवणुकीमुळे नुकसान होते.

भारतात दरवर्षी ७० ते ७५ हजार टन सुक्या कांद्याची निर्मिती केली जाते. यापैकी १५ टक्के कांदा देशात वापरला जातो. उरलेल्या ८५ टक्के कांद्याची रशिया, युरोप आणि मध्य पूर्व देशांमध्ये निर्यात केली जाते. या कांद्याला हॉटेल्स, केटरर्स आणि तयार खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांकडून मोठी मागणी असते. भारतात सुका कांदा निर्माण करणारे ९५ प्रक्रिया उद्योग आहेत. त्यापैकी ७५ उद्योग गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील महुवा येथे आहेत.

कमीत कमी प्रक्रिया केलेले कांदे :
कांदे सोलून किंवा कापून त्यांच्यात प्रिझर्वेटिव्हस (परिरक्षके) वापरली जातात. असे सोललेले किंवा कापलेले कांदे उत्तम पॅकेजिंगद्वारे अधिक काळ ताज्या स्वरूपामध्ये राहू शकतात. सोललेले कांदे ५ टक्के ऊर्ध्वपातित व्हिनेगारच्या द्रावणाचा वापर करून संरक्षित केले जातात.

कांदा पेस्ट… 
बदलत्या जीवनशैलीमुळे कांदा पेस्टला मागणी वाढत आहे. पेस्ट तयार करण्यासाठी कापलेले कांदे तेलामध्ये तळून घेतले जातात. नंतर मिक्सरमधून काढून त्यांची पेस्ट केली जाते. कांदा पेस्ट केल्यामुळे कांद्याची साठवणक्षमता वाढते. स्वयंपाकातही वापरण्यास कांदा पेस्ट सुलभ जाते…

निर्जलित (डिहायड्रेटेड) कांद्यापासून पावडर व फ्लेक्स (काप)..
कांद्याचे निर्जलीकरण केल्याने सूक्ष्मजीव वाढीस प्रतिबंध होऊन कांद्याची साठवणक्षमता वाढते; तसेच त्याचे आकारमान कमी होत असल्याने वाहतुकीसाठी सोपे जाते. निर्जलीकरणामुळे कांद्याची आर्द्रता कमी होते. अशा कांद्यांना योग्य प्रकारे काप देऊन, फ्लेक्स किंवा भुकटी तयार करता येते. डिहायड्रेटेड कांद्याचे फ्लेक्स आणि पावडर हे वातावरणातील आर्द्रता शोषून घेणारे आहेत, त्यामुळे त्यासाठी योग्य पॅकेजिंग तंत्रज्ञान वापरणे अत्यावश्यक आहे. अशा कांदा भुकटी किंवा कापांच्या निर्यातीला मोठा वाव आहे.

लोणचे …
व्हिनेगर किंवा तेलाचा वापर करून कांद्याचे लोणचे तयार करता येते. अमेरिका आणि युरोप बाजारपेठेमध्ये व्हिनेगर वापरून, तर आशिया-आफ्रिका बाजारपेठेमध्ये तेल वापरून बनवलेले कांद्याचे लोणचे लोकप्रिय आहे.

कांदा चटणी
चटणी प्रत्येक घरी स्वयंपाकात गरजेची वस्तू. वेगवेगळी मिश्रणे एकत्र करून चटणीला वेगळी चव आणली जाते. सध्याच्या गतिमान जीवनात- विशेषतः शहरांमध्ये चटणी बनवण्यास गृहिणींना सवड मिळत नाही. नोकरदार, परगावी स्थायिक झालेल्यांना, तसेच ज्या ठिकाणी स्वयंपाक अधिक मोठ्या प्रमाणात असतो, तेथे तयार चटणी असेल तर काम वेळेवर व सुलभ होते. मालाचा दर्जा चांगला असला की अशा तयार चटणीला मोठी मागणी असते.

तेल …
कांद्यापासून तेलसुद्धा तयार करता येते. प्रक्रियाकृत उत्पादनांमध्ये कांद्याचा स्वाद आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या तेलाचा वापर होतो. काही उत्पादनांमध्ये प्रिझर्वेटिव्ह (संरक्षक) म्हणूनही त्याचा वापर केला जाते.

सिरका / वाइन / सॉस :
कांद्यामध्ये साखर आणि इतर पोषक पदार्थ जास्त असतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रक्रिया करून व्हिनेगर (सिरका), सॉस आणि वाइन आदींची निर्मिती करता येते.

कांदा प्रक्रिया उदयोगाला आव्हान
भारतीय कृषी संशोधन समितीमध्ये, कांदा आणि लसूण संशोधन संचालन मंडळ आहे, ज्यांची भारतभरात २५ संशोधने केंद्रे आहेत. मात्र, कांद्याची साठवण आणि वाहतूक यासाठी कोल्ड चेन तंत्रज्ञान नाही. कांद्याचे उत्पादन वाढले आहे, मात्र खासगी क्षेत्रानेही आधुनिक साठवण सुविधांच्या विकासामध्ये गुंतवणूक केलेली नाही.

हेही वाचा:

The post नाशिक : कांदा शेतीला प्रक्रिया उद्योगाची गरज appeared first on पुढारी.