नाशिक : कांद्याची 20 दिवसांतच 50 टक्क्यांनी घसरण

कांदा

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
महागाईमुळे सर्वच वस्तूंचे दर वाढलेले असताना कांद्याच्या दरात जोरदार घसरण झाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी क्विंटलला सरासरी 2,551 रुपये असलेला दर आता दीड हजारावर आल्याने कमी भावात कांदा विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आलेली आहे. 20 दिवसांत कांद्याचे दर 50 टक्क्यांनी घसरल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

चांगला दर मिळेल या अपेक्षेने साठविलेला उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. त्यात दर घसरल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला क्विंटलला अगदी आठ रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. कांद्याचा भाव एवढा कमी झाला की, उत्पादन खर्चही निघणे अवघड असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. प्रचंड खर्च करून मेहनतीनंतरही शेतकर्‍यांवर केवळ कमी किमतीत कांदा विकण्याची वेळ आली आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍यांना 10 वर्षांपूर्वी मिळणारा दर आणि आज मिळणारा दर सारखाच आहे. दुसरीकडे मात्र उत्पादन खर्च तीनपटीने वाढला आहे. 10 वर्षांपूर्वी कांद्याला साधारण एकरी 20 हजारांपर्यंत खर्च येत होता. तोच खर्च आज 70 हजारांपर्यंत गेला आहे. इंधन दरवाढीमुळे शेतीच्या उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे. रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र, शेतमालाचे दर काही वाढताना दिसत नाही.

सरासरी भाव आलेख (प्रतिक्विंटल रुपये) :
1 नोव्हेंबर 2,551
5 नोव्हेंबर 2,400
10 नोव्हेंबर 2,000
17 नोव्हेंबर 1,600
19 नोव्हेंबर 1,500

हेही वाचा:

The post नाशिक : कांद्याची 20 दिवसांतच 50 टक्क्यांनी घसरण appeared first on पुढारी.