नाशिक : काकाच्या घरी घरफोडी करणारा गजाआड

घरफोडी www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आठवडे बाजारात खरेदीसाठी गेलेल्या काकाच्या घरी घरफोडी करून एक लाख 86 हजार 770 रुपयांची रोकड चोरणार्‍या पुतण्यास देवळाली कॅम्प पोलिसांनी पकडले आहे. पोलिसांनी संशयिताकडून घरफोडीतील रक्कम जप्त केली आहे. अविनाश देवीदास बिरछे असे या संशयित चोरट्याचे नाव आहे.

भगूर येथील इंदिरा संकुल परिसराजवळ राहणार्‍या अशोक दगडू बिरछे हे रविवारी (दि.24) आठवडे बाजारात खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्याने घरातील रोकड लंपास केली होती. या प्रकरणी बिरछे यांनी देवळाली कॅम्प पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. सीसीटीव्हींची पाहणी केली असता त्यात एक युवक बिरछे यांच्या घराजवळ संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याच्या चालण्याच्या शैलीवरून संशयित चोरट्यास पकडले. संशयित अविनाश देवीदास बिरछे हा परिसरात रंगकाम करत होता. चौकशी केल्यानंतर त्याने घरफोडीची कबुली दिली व रोकडही पोलिसांना दिली.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रकाश गिते, उपनिरीक्षक संदेश पाडवी, अंमलदार राजेंद्र गुंजाळ, संदीप साळवे, राहुल बलकवडे, ताजकुमार लोणारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा :

The post नाशिक : काकाच्या घरी घरफोडी करणारा गजाआड appeared first on पुढारी.