नाशिक: काठीपाडा येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

सुरगाणा, पुढारी वृत्तसेवा: भक्षाची शिकार करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रविवारी मध्यरात्री तालुक्यातील काठीपाडा येथे घडली. दरम्यान, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला सुखरूप विहिरीतून बाहेर काढले. तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रातील काठीपाडा येथील शेतकरी सिताराम दहावाड यांच्या मालकीची विहीर गावालगतच्या शेतात आहे. रात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काठीपाडा व आजूबाजूचा परिसर जंगलमय आहे. काही किलोमीटर अंतरावर गुजरातचे जंगल आहे. मध्यरात्री भक्षाचा शोधात किंवा पाठलाग करताना हा बिबट्या गावालगत असलेल्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बिबट्याचे वय अंदाजे एक दीड वर्षाचे आहे. रात्रभर हा बिबट्या विहिरीत असलेल्या मोटारीच्या पाईपला धरून होता. सदर प्रकार सकाळी लक्षात आल्यावर वनविभागास माहिती देण्यात आली.

दरम्यान, विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाहायला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी काही ग्रामस्थांनी विहिरीत दोराच्या सहाय्याने खाट सोडून बिबट्याला जीवदान मिळण्यास सहकार्य केले. पाईपला सोडून बिबट्या खाटेवर आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरठाण वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास नागरगोजे, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. आर. वेलकर तसेच वनरक्षक तुकाराम चौधरी, अरुण मेघा, भटु बागुल, योगेश गांगुर्डे, याशिनाथ बहिरम, भास्कर चव्हाण, वामन पवार, कल्पना पवार, अविनाश छगणे, रामजी कुवर, हिरामण थविल, यमुना बागुल व नाशिक येथील वन्यप्राणी बचाव सहाय्यक पथक आदींनी गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून बछडा असलेल्या बिबट्याला दुपारी बारा वाजेच्या सुमारास विहिरीतून सुरक्षित बाहेर काढून उंबरठाण येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात सुरक्षित नेले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर वरिष्ठ वन अधिकारी यांच्या सल्ल्याने बिबट्याला वनक्षेत्रात सोडण्यात येणार असल्याचे सांगिण्यात आले.

हेही वाचा 

The post नाशिक: काठीपाडा येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका appeared first on पुढारी.