नाशिक : कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार – ना. डॉ. विजयकुमार गावित

विजयकुमार गावित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील कातकरी समाजातील अल्पवयीन मुलीची झालेली विक्री व त्यानंतर तिचा झालेला मृत्यू हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. या प्रकरणानंतर राज्यातील आदिम व आदिवासी समुदायांच्या लोकांचे होणारे स्थलांतर व त्यांचे प्रश्न चव्हाट्यावर आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आदिम आदिवासी कातकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविला जाणार असून, त्या माध्यमातून त्यांना मुख्य प्रवाहात आणणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.

कातकारी समुदायाच्या बालकांकडून अहमदनगर जिल्ह्यात वेठबिगारी केली जात असल्याचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि.15) शासकीय विश्रामगृहात वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कातकरी समाजाची पार्श्वभूमी, त्यांच्यासाठी लागू असलेल्या योजना, मिळालेले लाभ, लाभापासून वंचित राहिल्याची कारणे, होणारे स्थलांतर त्याची कारणे यासाठीचे सर्वेक्षण प्रत्येक वाड्या-पाड्यात करण्यात येणार आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी त्याबाबतचा ठोस कृती आराखडा तयार करून सहा महिन्यांत त्याची 100 टक्के अंमलबजावणी करण्यात येईल, असे ना. डॉ. गावित यांनी सांगितले.
इगतपुरी तालुक्यातील आदिम आदिवासी कातकरी समाजाचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविण्याच्या दृष्टीने त्यांना सुमारे 1,400 घरकुले बांधण्याची योजना विचाराधीन आहे. या समाजाच्या गरजा लक्षात घेऊन पुनर्वसन करण्यासाठी ठोस पावले शासनामार्फत उचलली जाणार आहेत. नुकत्याच वेठबिगारीत आढळून आलेल्या बालकांना व त्यांच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकास 30 हजारांची मदत राज्य शासनामार्फत केली जाणार असून, केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येकी दोन लाख रुपये त्यांना मिळावेत, यासाठीचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्यात येणार असल्याचेही ना. डॉ. गावित यांनी स्पष्ट केले.

वाड्या-वस्त्यांवर
मूलभूत सुविधा पुरविणार
आदिवासी भागातील डोंगराळ भागात लहान पाडे व वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची, आरोग्य यंत्रणेची मोठी समस्या आहे. वाडे-पाडे, वस्त्या या येणार्‍या वर्षभरात रस्त्यांनी व विद्युतीकरणाच्या माध्यमातून जोडण्यात येईल. पेयजलाच्या समस्येवर शाश्वत स्वरूपाच्या उपाययोजनांसाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जलजीवन मिशनच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला जाईल. असे ना. डॉ. गावित यांनी सांगितले.

‘त्या’ पीडितेवर बलात्कार नाही
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील 45 दिवस मिठामध्ये राखून ठेवलेल्या मुलीच्या मृतदेहाचे दोनदा श्वविच्छेदन करण्यात आले आहे. या वैद्यकीय अहवालात मुलीवर बलात्कार झाला नसल्याने स्पष्ट झाले आहे. तरीदेखील बलात्कार झाल्याचे आरोप होत असून, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी सुरू आहे. चौकशीनंतरही काही संशय वाटल्यास वरिष्ठ पातळीवर चौकशी केली जाईल, असे ना. डॉ. गावित यांनी स्पष्ट केले.

The post नाशिक : कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार - ना. डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.