नाशिक : कामगारदिनी कामावर राबवले मजूर?

kamgar www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात कोट्यवधींची विकासकामे होत असली तरी त्यावर प्रशासकीय नियंत्रण अथवा साधे लक्षही नसल्याच्या घटना सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यातून उघड होत आहेत. साधारण दोन कोटी रुपयांतून झोडगे-अस्ताणे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी खडीकरणाचे काम मंजूर झाले आहे. त्याविषयी कार्यस्थळी नियमानुसार फलक न लावता, प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता कामाला प्रारंभ करण्यात आला. त्यातही कार्यादेशाप्रमाणे खडी व मुरमाचा वापर होत नसल्याचा प्रकार असला तरी त्यापेक्षाही गंभीर म्हणजे, कामगार दिन (दि.1) या शासकीय सुट्टीच्या दिवशीही मजुरांना सुट्टी दिली गेली नसल्याच्या तक्रारी आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टीचा आनंद घेणार्‍या अधिकार्‍यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी या बाबत अवगत केल्यानंतर अखेर संबंधित ठेकेदाराला खुलासा करण्याची नोटीस निघाली आहे.

शासनपातळीवर लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा होऊन विकासकामे मंजूर होतात. ती योग्य प्रकारे ठेकेदाराकडून करून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. मात्र, कामाच्या ठिकाणी फिरकण्याचीही तसदी अधिकारी घेत नाहीत. तेव्हा दर्जाबाबत नागरिकांनाच जागरूक राहण्याशिवाय पर्याय नाही. याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनीही ग्रामस्थांना सतर्क राहून चांगली कामे करून घेण्याचा यापूर्वी सल्ला दिला होता. त्यातून योग्य बोध घेत काही जागरूक ग्रामस्थांनी झोडगे-अस्ताणे रस्ता कामात होत असलेल्या त्रुटींकडे लक्ष वेधले आहे. टिंगरी, राजमाने, झोडगे, पळासदरे, गुगुळवाड, शेरुळ, देवघट, साकूर या रस्त्याच्या सुधारणेचे काम मंजूर झाले आहे. अस्ताणे-झोडगे या कामात दोन टप्प्यांत खडी टाकण्याचे निश्चित आहे. पहिला टप्पा हा 6 इंचांचा असून, त्यात 75 एमएच खडी आणि दुसर्‍या टप्प्यात 3 इंचांच्या कामात 40 एमएम खडी टाकून पाणी मारून रोलिंग करण्याचे आदेश आहेत. शिवाय यात मुरमाचा वापर होणे अपेक्षित असताना चुनखडी मिश्रित माती वापरल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला आहे. त्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांंपासून वरिष्ठांपर्यंत तक्रारी झाल्या असता, केवळ जुजबी कार्यवाहीवर बोळवण केली जात असल्याच्या तक्रारी आहेत.

अधिकारीच विचारतात, ठेकेदार कोण?
ग्रामीण दळणवळणाच्या द़ृष्टीने महत्त्वाच्या रस्त्याचे काम होत असल्याचे समाधान असले तरी त्याच्या दर्जाविषयी शंका आहे. कामात नमूद खडी आणि माती या सर्वसामान्य गोष्टींना बगल दिली गेली. अभियंत्यांना तक्रार केली तर तेच ठेकेदार कोण, असा सवाल करतात. तक्रारीनंतर रात्रीतून सारवासारवचा प्रयत्नही झाला. कामाच्या ठिकाणी ठळक माहिती देणारा फलक नाही. कामगारदिनी शासकीय नियमानुसार काम बंद ठेवण्याचा दंडक आहे. तोही पाळलेला नाही. कनिष्ठ अभियंता चव्हाण यांनी स्थळ पाहणी केली असून, चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आलेली माती काढण्याची मागणी केली असता त्यांनी ती मान्य केल्याचे कोमलसिंग राजपूत, रामराव बच्छाव, प्रदीप मोरे, विठोबा द्यानद्यान यांनी कळविले आहे.

* अस्ताणे ग्रामपंचायत कार्यालयाच्या पत्राचा संदर्भ घेऊन उपविभागीय अभियंता यांनी संबंधित ठेकेदाराला कामगारदिनी काम का सुरू ठेवले, याबाबत खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. रुंदीकरणासाठी खडीकरणाचे काम प्रगतिपथावर असले तरी त्यात सुधारणेला वाव असल्याचेही त्यात नमूद केले आहे. त्यातही विशेष म्हणजे, हे काम कुठलीही पूर्वसूचना न देता सुरू केल्याचाही एकप्रकारे चमत्कारिक ठरलेला प्रशासकीय खुलासा चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कामगारदिनी कामावर राबवले मजूर? appeared first on पुढारी.