नाशिक : कार्तिकस्वामी मंदिरात महोत्सवाची जय्यत तयारी

kartik swami www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
काशी नाट्टुकोटाई नगर छत्रम् मॅनेजिंग सोसायटीकडून शनि चौकातील कार्तिकस्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त (दि. 7) महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वीच मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम करण्यात आले असून, गाभारा सजविण्यात आला आहे. मंदिराला रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

कोरोना काळात मागील दोन वर्षे सर्वत्र निर्बंध असल्याने हा महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. यंदा शासनाने सर्व सण आणि उत्सवांवरील सर्व निर्बंध हटवल्याने उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोमवारी (दि. 7) सायंकाळी 4 वाजून 17 मिनिटांनी कार्तिक पौर्णिमा सुरू होणार आहे. त्यावेळी अभिषेक, महापूजा आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येईल. मंगळवारी (दि. 8) सायंकाळी 4 वाजून 32 मिनिटांपर्यंत पौर्णिमा असल्याने या काळात भाविक दर्शन घेऊ शकतील. रात्री 1 वाजून 39 मिनिटांनी कृतिका नक्षत्र सुरू होणार असून, ते बुधवारी (दि. 9) रात्री 3 वाजून 9 मिनिटांपर्यंत असल्याने या मुहुर्तावर भाविकांना दर्शन घेता येईल. श्री काशी नाट्टुकोटाई नगर छत्रम् मॅनेजिंग सोसायटीतर्फे मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. मंदिरात दर्शनासाठी प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग करण्यात आले आहे. त्या द़ृष्टीने बॅरिकेड्स लावण्यात आले आहे, त्यामुळे भाविकांना दर्शन घेणे सुलभ होणार आहे. कार्तिक पौर्णिमेला गर्दी होत असल्याने काही भाविक कार्तिक एकादशीलाच मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिराच्या बाहेर प्रसाद आणि कार्तिकस्वामींना अर्पण करण्यात येणारे मोराचे पिस यांची दुकाने लावण्यात आली आहेत. महोत्सवानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन या परिसरातील वाहतूक मार्ग वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कार्तिकस्वामी मंदिरात महोत्सवाची जय्यत तयारी appeared first on पुढारी.