नाशिक : कार्यकारिणीत डावलल्याने मनसेचे ‘विद्यार्थी’ ना‘राज’

मनविसे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची नाशिक शहर व जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून, यात डावलण्यात आल्याने काही मनसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातील एकाच नेत्याच्या मर्जीतील कार्यकर्त्यांनाच स्थान देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आल्यामुळे मनसेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने तीन दिवसांपूर्वी सोमवारी (दि. 19) मुंबई येथे मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या नाशिक शहर व जिल्हा कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकार्‍यांची नावे जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी निवडण्यापूर्वी प्रदेश कार्यकारिणीवरील आणि पक्षस्थापनेपासून एकनिष्ठ असलेल्या काही पदाधिकार्‍यांना डावलण्यात आल्याचा आरोप करीत काही मनसैनिकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यकारिणीत काहींना पुन्हा संधी देण्यात आली असून, काहींना साधे विश्वासातही घेतले गेले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पक्षाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये उत्स्फूर्त सहभागी होऊनही आणि वेळप्रसंगी अनेकदा अंगावर केसेस घेऊनही अशा प्रकारे अन्यायकारक वागणूक मिळत असल्याने नाराजी उघड करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवरून पक्षश्रेष्ठींची दिशाभूल केली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. आगामी मनपा निवडणुकीच्या तोंडावर मनसेत नाराजीनाट्य घडले असून, पक्षश्रेष्ठींनी ना‘राज’ मनसैनिकांची वेळीच दखल घेण्याची गरज आहे अन्यथा निवडणुकीत त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पक्षस्थापनेपासून आजपर्यंत प्रत्येक आंदोलन, मोर्चे आणि उपक्रमांमध्ये सहभाग घेतलेला आहे. अनेक केसेस दाखल आहेत. असे असताना गेल्या निवडणुकीतही मला डावलून आयात व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली. निकालाच्या चौथ्याच दिवशी ती व्यक्ती पुन्हा जुन्या पक्षात गेली, तरीदेखील आम्ही निष्ठेने पक्षाचे काम सुरू ठेवले. आतादेखील प्रदेश कार्यकारिणीवर असतानाही मला विश्वासात न घेता, नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली व यात माझ्यासह काही जुन्या कार्यकर्त्यांनाही डावलण्यात आले आहे. – गणेश मंडलिक, माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य, मनविसे.

अमित ठाकरेंकडे नाराजी‘पत्र’ 
पक्षस्थापनेच्या आधीपासून राज ठाकरेंसोबत असतानाही अन्यायकारक वागणूक मिळत असल्याने नाराजांनी थेट मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांच्याकडेच पत्राद्वारे तक्रार केली आहे. या तक्रारीत नाशिकमध्ये कशा प्रकारे गटबाजी सुरू आहे, याचा पाढाच वाचण्यात आला आहे. पक्षश्रेष्ठींवर आमचा विश्वास असून, त्यांच्याकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षाही नाराजांनी व्यक्त केली आहे. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अमित ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : कार्यकारिणीत डावलल्याने मनसेचे ‘विद्यार्थी’ ना‘राज’ appeared first on पुढारी.