नाशिक : काळ आला होता; पण…,भीषण अपघातात बालंबाल बचावले तिघे शिक्षक

मालेगााव अपघात,www.pudhari.news

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
नियंत्रित वेगात प्रवास करणार्‍या शिक्षकांच्या कारला भरधाव वेगातील कंटेनरने जबर ठोस दिली. त्यामुळे कार थेट पुढे धावणार्‍या कंटनेरखाली दबली गेली. परंतु, दैव बलवत्तर म्हणून गंभीर दुखापतीवर निभावले. तिघे शिक्षक सुरक्षित बचावल्याचा भिषण अपघात मुंबई – आग्रा महामार्गावर लब्बैक हॉटेलसमोर गुरुवारी (दि.13) दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडला. अपघातात चक्काचूर झालेल्या कारची स्थिती पाहून प्रत्येकाच्याच काळजाचा ठोका चुकला. जखमी शिक्षकांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात एनडीएसटी निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना या संस्थेशी निगडित शिक्षकांना ‘काळ आला होता, पण..’ या उक्तीची प्रचिती आली. जखमी शिक्षक सुनील नारायण निकम (53, रा. विजयनगर, कॅम्प) यांनी पवारवाडी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या फियादीनुसार, ते किरण बाबुलाल भामरे (45) व बाजीराव नामदेव कदम (56) यांच्यासमवेत कारने (एमएच 39 एबी 0308) मनमाड चौफुलीकडून चाळीसगाव चौफुलीच्या दिशेने जात होते. समोर कंटेनर असल्याने त्यामागे ते धिम्यागतीने झाले असता गतिरोधकावर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने (एनएल 01 एसी 2138) त्यांना जबर ठोस दिली. त्याने कार थेट पुढील कंटेनरच्या खाली घुसली. या अनपेक्षित प्रसंगातही तिघे सावध असल्याने त्यांनी स्वत:चे अंग चोरले. परिणामी, ते थोडक्यात बचावले. परंतु त्यांना गंभीर दुखापत झाली. निकम यांच्या छातीस, भामरे यांच्या उजव्या पायाला, छातीला आणि कदम यांच्या उजव्या पायाला व पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य केले. जखमींना बाहेर काढून तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, कंटेनरचालक फरार झाला. त्याच्या विरोधात पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस नाईक भरत गांगुर्डे हे तपास करित आहेत.ोया अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार आसिफ शेख यांनी मालेगाव दौर्‍यावर असलेल्या माजी मंत्री फौजीया खान यांच्यासमवेत घटनास्थळी धाव घेतली. सवंदगाव फाटा व लब्बैक हॉटेल परिसरात महामार्गावर कायमच अपघात होतात. त्यावर महामार्ग प्राधिकरणाकडून उपाययोजना होत नसल्याने अनेकांचा हकनाक जीव जात असल्याच्या समस्येकडे शेख यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा :

The post नाशिक : काळ आला होता; पण...,भीषण अपघातात बालंबाल बचावले तिघे शिक्षक appeared first on पुढारी.