नाशिक कुंभनगरीची ओळख होतेय ‘योगनगरी’

नाशिक : निल कुलकर्णी

योग मन, शरीर आणि आत्मा यांना जोडणारा प्रमुख दुवा म्हणजे व्यायाम. तशीच ती परिपूर्ण जीवनशैलीही आहे, असे योगाबद्दल सांगितले जाते. नाशिककरांनी योगाला जाणून घेत त्याच्या नित्य अभ्यासाने सर्वार्थाने योगाला जीवनशैली करण्यासाठी ध्यास घेतला आहे. शहरात वाढणाऱ्या योगशिक्षण संस्था, क्लासेस आणि योगावर नितांत श्रद्धा असणारे लाखो योगसाधक पाहता योग नाशिककरांसाठी जीवनशैलीच झाल्याचे आश्वासक चित्र आहे. विशेष म्हणजे योग स्वत: शिकून त्याचा समाजासाठी प्रसार-प्रचार करणाऱ्यांच्या संख्येतही गेल्या दहा वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे.

‘योग स्वत:साठी आणि समाजासाठी’ ही यंदाची संकल्पना आहे. योगाचा प्रसार-प्रचार करणारे योग विद्याधाम नाशिकमध्ये आहेच. योगाचे अनेक क्लासेस, प्रशिक्षण वर्ग नाशिकमध्ये गेल्या पाच वर्षांत विलक्षण प्रमाणात वाढल्याचे चित्र आश्वासक आहे. कॉलनी, वसाहती, नगरांमधील कम्युनिटी हॉल, उद्याने, मैदानात योग शिकवणारे प्रशिक्षक वाढले असल्याची माहिती योग क्षेत्रात कार्य करणाऱ्या जाणकार देत आहेत.

  • मास्टर्स ऑफ आर्ट शिकवणाऱ्या संस्था : ५ पेक्षा अधिक
  • योगशिक्षकांची संख्या : ८० हजारांहून अधिक
  • नोंदणीकृत योग इन्स्टिट्यूटची संख्या : १० पेक्षा अधिक
  • योगसाधकांची संख्या : घरोघरी लाखो साधक याेगसाधना करत आहेत.
  • ‘योग स्वत:साठी अन् समाजासाठी’ ही संकल्पना ठरत आहे सार्थ

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत योग दिनाची संकल्पना मांडली आणि त्याच्या पुढील वर्षी म्हणजे २०१५ मध्ये जागतिक योग दिनाला प्रारंभ झाला. गेल्या दशकात योग आणि योगसाधकांची संख्या प्रचंड वाढल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी सुरू झालेले योग क्लासेस, नाशिक शहरात असलेले योग विद्याधाम, योग विद्यापीठ आणि येथील नागरिकांनी निरामय आयुष्यासाठी योगाचा नियमित प्रसार-प्रचार केल्याने नाशिक गेल्या दशकात योगनगरी झाली आहे. जिल्ह्यात लाखो नागरिक ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष योगशिक्षकांकडून योग शिक्षण घेत आहे. इतकेच नव्हे तर योग स्वत:साठी म्हणून सुरुवात केल्यानंतर आधी केवळ शरीरासाठी आवश्यक योग नाशिककरांची जीवनशैली झाली आहे. एकूणच नाशिककरांनी ‘योग स्वत:साठी आणि सुदृढ समाजासाठी’ हे ब्रीद सार्थ ठरवत आहे.

गेल्या दहा वर्षांत नाशिकमध्ये योगशिक्षकांची संख्या प्रचंड वाढली आहे. जिल्ह्यात दरवर्षी एका संस्थेतून एका बॅचमधून ५० ते ६० योगशिक्षक प्रशिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. योगाचा प्रचार, प्रसार वाढला असून काही व्याधी, आजारांवर यासह मानसिक अस्वस्थता, ताण-तणावांवरही योग प्रभावी ठरत असल्यामुळे याचे महत्त्व वाढतच आहे. मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी, एक सर्वांगसुंदर व्यायामप्रकार म्हणून तसेच मनाचे शुद्धीकरण, मन:शक्ती वाढवण्यासाठी उत्कृष्ट पद्धती म्हणूनही योगाला नागरिकांनी आपलेसे केले आहे. – हिमांशू गायकवाड, विक्रमवीर योग प्रशिक्षक, संचालक, फिट होगा वेलनेस स्टुडिओ, नाशिक.

हेही वाचा: