नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून ७० कोटी रुपये खर्चातून इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरची उभारणी केली जात आहे. याअंतर्गत साधुग्रामध्ये २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, साधुग्रामसह शहर परिसरावर ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील नियंत्रण कक्षाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती स्मार्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिली आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो साधू-महंत व भाविक नाशिकला येणार आहेत. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरची उभारणी करण्याची सूचना महापालिका आणि पोलिस प्रशासनाने स्मार्ट सिटी कंपनीला केली होती. त्यानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. याअंतर्गत राजीव गांधी भवनातील तिसऱ्या मजल्यावर नियंत्रण कक्ष उभारले जात आहे. साधुग्राममध्ये सुमारे २०० सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, शहर तसेच साधुग्राम परिसरात चार ड्रोनच्या सहाय्याने बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. हे ड्रोन आणि सीसीटीव्ही मनपात साकारण्यात येणाऱ्या नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार आहेत. प्रकल्पासाठी एकूण ७० कोटी रुपयांचा खर्च येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांनी सांगितले.
हा प्रकल्प केवळ सिंहस्थ कालावधीतच नव्हे तर एरवी आपत्ती व्यवस्थापनातही उपयुक्त ठरणार आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद सुधारणे, स्वच्छ शहर आणणे आणि महापालिका आणि कायदा अंमलबजावणी एजन्सी यांसारख्या शहरातील सर्व ऑपरेशनल स्टेक होल्डर्समध्ये अधिक मजबूत इंट्रा-कम्युनिकेशन सिस्टीम विकसित करणे ही या प्रकल्पाच्या उभारणीमागील मूळ संकल्पना असल्याचे मोरे यांनी सांगितले.
असे असणार इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर..
सिंहस्थ काळात साधुग्राममधील २०० सीसीटीव्ही कॅमेरे तसेच शहर परिसरातील ड्रोन या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरला जोडले जातील. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, आणीबाणीच्या परिस्थितीत सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय राखण्याचे काम या नियंत्रण कक्षामार्फत केले जाईल. नाशिक पोलिसांना डेटा आधारित निर्णय घेण्यासाठी तसेच सोशल मीडिया विश्लेषणासाठी देखील हा कक्ष उपयुक्त ठरेल.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सिंहस्थकाळातही गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उपयुक्त ठरणार आहे. याअंतर्गत मनपा मुख्यालयात नियंत्रण कक्ष उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत नियंत्रण कक्षाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
– सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी
हेही वाचा :
- पिंपरी : ‘पीएमआरडीए’मधील अनधिकृत बांधकामे नियमित करणे शक्य
- Kolhapur : कबनुरात किरकोळ कारणातून कोयत्याने हल्ला; तिघे जखमी
- Ghoomer Film : हर्षा भोगले-अजिंक्य रहाणेने केलं घूमरचं कौतुक (Video)
The post नाशिक : कुंभमेळ्यासाठी ७० कोटींचे इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर appeared first on पुढारी.