नाशिक : कुठलीही यादी आली की, ही कामे माझीच!

Sinner www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा नियोजन समितीमार्फत खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या शिफारशीने तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये नूतन वर्गखोल्या व काही वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे. सिन्नरचे विद्यमान आमदार मात्र विकासकामांची कुठलीही यादी आली की, ही माझीच कामे असल्याचे जाहीर करून फुकटचे श्रेय लाटतात. त्यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, अशी टीका पंचायत समितीचे माजी गटनेते उदय सांगळे यांनी केली आहे.

जिल्हा नियोजन समितीमार्फत तालुक्यातील 31 गावांमधील शाळांच्या वर्गखोल्या व दुरुस्ती या कामांसाठी जवळपास अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार कोकाटे यांनी दिली होती. त्यानुसार वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर उदय सांगळे यांनी पत्रकार परिषद घेत त्यावर आक्षेप नोंदवत हा श्रेय लाटण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, गोंदे येथील जिल्हा परिषद शाळेच्या आठ वर्गखोल्यांसाठी जवळपास 76 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे यांनी शिफारस केली होती. जिल्हा परिषद व इम्पथी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हे काम होणार आहे. तसेच दोडी खुर्द, पिंपळे, दत्तनगर, सोनारी, सोनांबे, जयप्रकाशनगर, सोनेवाडी येथील वर्गखोल्या व दुरुस्तीला खासदार हेमंत गोडसे यांनी शिफारस केली होती. त्याचेही श्रेय आमदार कोकाटे कसे घेऊ शकतात? असा सवाल सांगळे यांनी उपस्थित केला आहे.

कोकाटेंच्या ‘त्या’ सवयीमुळे सिन्नरचे नुकसान : गोडसे
सिन्नर तालुकादेखील नाशिक लोकसभा मतदारसंघात येतो, हे आमदार कोकाटे यांनी विसरू नये कारण लोकसभा मतदारसंघाचा सदस्य म्हणून माझ्या शिफारशींनीही काही कामे मंजूर झाली आहेत. आमदार कोकाटे यांच्या शिफारशीने मंजूर झालेली कामे आम्हालाही मान्य आहेत. यापूर्वी शिवडे येथील एक काम माझ्या शिफारशीने मंजूर झाले होते. त्यातही त्यांनी श्रेय लाटून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला होता. श्रेय लाटण्याच्या सवयीमुळे सिन्नर तालुक्याचे नुकसान होईल, असे खा. गोडसे यांनी नमूद केले.

हेही वाचा:

The post नाशिक : कुठलीही यादी आली की, ही कामे माझीच! appeared first on पुढारी.