नाशिक : कृषी अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्यांना प्रतीक्षा आदेशाची

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कृषी विभागातील वर्ग एक आणि दोनच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांना राज्यात झालेल्या सत्तांतराचा फटका बसला आहे. या बदल्यांसाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशाकडे अधिकारी डोळे लावून बसले आहे, तर वर्ग तीनच्या कर्मचार्‍यांच्या बदल्या विभागीय कृषी सहसंचालक स्तरावरून होत असतात. मात्र, त्यांनादेखील या बदल्यांबाबत पुढील आदेशाची वाट बघावी लागणार आहे.

दरम्यान, कृषी विभागाने तांत्रिक, प्रशासनिक संवर्गातील गट ब आणि क या संवर्गाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या, पदोन्नती, अंशतः बदलासाठी पुढील आदेश होईपर्यंत शासनाच्या मान्यतेशिवाय त्या करण्यात येऊ नयेत, असे पत्र कृषी सहसंचालक कार्यालयाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे जे कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक वाहनचालक आपल्या इच्छुक स्थळी बदलीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते, त्यांची निराशा झाली आहे. कृषी विभागात तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या पदोन्नती बाकी आहेत. त्यामुळे या वर्गातील अधिकार्‍यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कृषी अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्यांना प्रतीक्षा आदेशाची appeared first on पुढारी.