नाशिक : केंद्राच्या धर्म, जातीयवादामुळे राज्यघटना संकटात : बाळासाहेब थोरातांची टीका

बाळासाहेब थोरात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारमधील भाजपकडून दहशत निर्माण करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. महागाईमध्ये वाढ होऊनही त्यावर उपाययोजना करण्याऐवजी भाजप समाजामध्ये धर्म आणि जातीयवाद वाढीस लावत असल्याने राज्यघटना संकटात सापडल्याची टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. भाजप-शिंदे गटाने मंत्र्यांचे अधिकार थेट सचिवांना प्रदान केल्याने या सरकारने आता मंत्रालयाची पाटी काढून त्या जागी सचिवालय अशी पाटी लावण्याचा सल्लाही थोरात यांनी दिला.

काँग्रेसतर्फे दि. 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आजादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते. काँग्रेसने गरीब, श्रीमंत आणि धर्म, जात याविषयी कधीही भेदभाव केला नाही. सर्वांना समान हक्क देणारी राज्य घटना काँग्रेसने देशाला दिली. यूपीए सरकारच्या कालावधीत रोजगार हमी योजना, शिक्षणाचा हक्क, माहितीचा अधिकार, अन्नसुरक्षा कायदा यासारखे महत्त्वाचे निर्णय घेतल्याची आठवण थोरात यांनी करून दिली. सध्या केंद्र सरकारच्या राजवटीत जीवनावश्यक वस्तूंवर कर आकारून भाजपकडून महागाईची भेट दिली जात असल्याचा आरोप करत, भाजपकडून सुरू असलेल्या सुडाचे नाट्य पाहता, राज्य घटनेचे अस्तित्व संपते की काय, अशी स्थिती निर्माण झाल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. या सर्व प्रकाराची माहिती आजादी गौरव यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. नंदुरबार येथील शिरीषकुमार यांचे देशासाठी हौतात्म्य आजही स्मरणात असल्याचे सांगितले.

खातेवाटपावरूनच शिंदे गट-भाजपमध्ये घोळ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून भाजप देशामध्ये जातीय तेढ आणि धर्मवाद या गोष्टी राबवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा काँग्रेसचा विचार आहे. हा विचार कठीण असला, तरी त्यात एक ना एक दिवस नक्की यश मिळेल, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.

थोरातांसमोरच माजी जिल्हाध्यक्षांची नाराजी
आजादी गौरव पदयात्रेसंदर्भात माहिती देण्यासाठी नाशिकमध्ये आलेले काँग्रेसचे नेते तथा विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासमोरच माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी स्थानिक नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त केली. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच नाराजी उघड झाल्याने काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

नाशिक शहराध्यक्षपद गेल्या आठ वर्षांपासून रिक्त आहे. शरद आहेर हे सध्या प्रभारी म्हणून शहराध्यक्षपदाचा कारभार पाहात आहेत. परंतु, आहेर यांच्याकडून स्थानिक इतर पदाधिकारी व नेतृत्वाला सोबत घेतले जात नाही तसेच विश्वासात घेतले जात नसल्याने अनेकदा अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीन ते चार वेळा नाशिक शहराध्यक्षपदी निवड करण्यासंदर्भात आश्वासन दिले. मात्र, दरवेळी हे आश्वासन हवेतच विरले. महापालिकेचे अपक्ष माजी नगरसेवक गुरूमित बग्गा यांना मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षपदी विराजमान करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मिळालेल्या आश्वासनानंतर बग्गा यांनी महापालिकेची मुदत संपुष्टात येण्याआधीच तीन महिने अगोदर नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. परंतु, आजतागायत बग्गा यांना काँग्रेसकडून साधी विचारणादेखील झालेली नाही की, माहितीही घेण्यात आलेली नाही. शहराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले राहुल दिवे, डॉ. शोभा बच्छाव, राजेंद्र बागूल, डॉ. हेमलता पाटील, शाहू खैरे ही मंडळी तर डोळे लावून बसलेली आहेत. परंतु, शहराध्यक्षपदाबाबत निर्णयच घेतला जात नसल्याने स्थानिकांकडून वरिष्ठ नेतृत्वाविषयीही असंतोष व्यक्त केला जात आहे. त्यात स्थानिक नेतृत्व असलेल्या पदाधिकार्‍याकडून अर्थात, शरद आहेर यांच्याकडून विश्वासात घेतले जात नाही आणि कार्यक्रम तसेच बैठकांची माहिती दिली जात नसल्याचे आरोप केले जात असल्याचा प्रत्यय शनिवारी (दि.6) बाळासाहेब थोरात यांच्यासमोरच आला.

काँग्रेस नाही शरद काँग्रेस म्हणा
माजी जिल्हाप्रमुख राजाराम पानगव्हाणे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत डॉ. शोभा बच्छाव आणि डॉ. हेमलता पाटील यांना उद्देशून, तुम्ही स्थानिक नेतृत्व का करत नाही, असा प्रश्न केला. तसेच काँग्रेसचे नाव आता शरद काँग्रेस ठेवा, असा टोलाही पानगव्हाणे यांनी हाणत आहेर आणि एकूणच काँग्रेस नेतृत्वावरील आपली नाराजी बोलून दाखवली.

हेही वाचा:

The post नाशिक : केंद्राच्या धर्म, जातीयवादामुळे राज्यघटना संकटात : बाळासाहेब थोरातांची टीका appeared first on पुढारी.