नाशिक : केळीने भाव खाल्ल्याने पूरक आहारात आता …

नागलीचे पापड,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील जवळपास साडेसहा लाख विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत दर बुधवारी पोषण आहारांतर्गत पूरक आहार म्हणून केळीवाटप केली जात होती. त्यामुळे जिल्ह्यात केळीचे दर अचानक वाढल्याने शिक्षकांना जास्त पैसे देऊन केळी खरेदी करावी लागत होती. याबाबत दै. ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी केळीवाटपाचा निर्णय मागे घेत विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून नागलीचे पापड देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही शाळांमध्ये नागलीचे पापड देण्यास सुरुवात झाली आहे.

गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे केळीचे दर गेल्या १५ दिवसांत प्रचंड वाढले होते. पूरक आहारात केळी कशी वाटायची तसेच पूरक आहारासाठी तरतूद असलेल्या शासन दरापेक्षा केळीचा सध्याचा दर जास्त होत असल्याने केळी कशा पुरवायच्या असा प्रश्न शिक्षकांना पडला होता. याबाबत दै. ‘पुढारी’ने बुधवारी (दि. १५) ‘पूरक आहार केळीला महागाईची झळ’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी नागलीचे पापड देण्याबाबत आदेश दिले आहेत.

तृणधान्य वर्षात नागलीचे पापड

संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाने तृणधान्य पिकाच्या उत्पादनात वाढ करणे, तृणधान्यांमुळे त्याचे आहारातील अनन्यसाधारण महत्त्व विचारात घेऊन लोकांच्या आहारातील त्यांचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे, त्या अनुषंगाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत विविध विभागांना कळविले आहे. तसेच राज्य शासनातर्फे फेब्रुवारी हा महिना तृणधान्य समर्पित महिना म्हणून साजरा केला जात आहे. याच अनुषंगाने दर बुधवारी पूरक आहारामध्ये सर्व लाभार्थ्यांना नाचणीचे पापड (मोठ्या आकाराचे) तळून देण्यात यावेत, असे आदेश शिक्षणाधिकारी फुलारी यांनी दिले आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : केळीने भाव खाल्ल्याने पूरक आहारात आता ... appeared first on पुढारी.