नाशिक : केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली साधूमहाराजांची ऑनलाईन फसवणूक

ऑनलाईन गंडा

येवला, पुढारी वृत्तसेवा : केवायसी अपडेट करण्यासाठी बँकेच्या खात्याचे पासबुक, पॅनकार्ड, एटीएम कार्ड याची माहिती घेऊन  ठकबाजांनी महाराजांची ऑनलाईन फसवणूक केली. गोपालनंदन गुरुरामगिरी महाराज असे फसवणूक करण्यात आलेल्या महाराजांचे नाव आहे. या ठगांनी महाराजांना तब्बल १ लाख ४४ हजार रुपयांना गंडा घातला आहे. या साधू महाराजांचे बँक खात्याचे डिटेल घेऊन त्यांच्या खात्यातून रक्कम ठकबाजांनी लंपास केली आहे. गोपालनंदन महाराजांनी सायबर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनंतर तालुका पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता.१५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४ सप्टेंबरला आश्रमात असताना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन केलेल्या व्यक्तीने बँक ऑफ बडोदाच्या मेन ऑफीसमधून बोलत असल्याचे सांगत बँक खात्याचे केवायसी अपडेट करा, अन्यथा खाते कायमस्वरूपी बंद होईल असे सांगितले. बँक खाते बंद होईल या भितीने महाराजांनी त्यांना ही माहिती दिली. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांच्या खात्यातून बरेच युपीआय ट्रान्झेक्शन झाल्याचे मेसेज आलेले होते. त्यांनी अंदरसूल येथे जावून बँकेत घडलेला प्रकार सांगितल्यावर ऑनलाईन फसवणूक झाल्याचे त्यांना समजले. या प्रकरणी गोपाल नंदन महाराजांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक अनिल भावारी अधिक तपास करत आहेत.

हेही वाचलंत का?

The post नाशिक : केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली साधूमहाराजांची ऑनलाईन फसवणूक appeared first on पुढारी.