Site icon

नाशिक : केसपेपरवरील जातीच्या उल्लेखास आक्षेप

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
येथील उपजिल्हा रुग्णालयात केसपेपरवर जात नमूद करावी लागल्यानंतर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. उपचारांसाठी जात विचारणे योग्य नसल्याने तो कॉलम रद्द करावा, अशी मागणी रिपाइंचे युवा तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी केली आहे.

मनमाड शहरासह ग्रामीण भागातील गोरगरिबांना स्वस्त दरात आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी शासनाने 2004 मध्ये 50 बेड्सचे उपजिल्हा रुग्णालय येथे सुरू केले आहे. येथे विविध उपचार केले जातात. येथे रोज सर्व जाती-धर्मांचे रोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. येथील केसपेपरवर 9 कॉलम असून, त्यात जात म्हणून एक कॉलम आहे. केसपेपर काढल्यानंतर तो घेऊन डॉक्टरकडे गेल्यानंतर हा कॉलम भरण्यासाठी डॉक्टर रुग्णाला त्याची जात विचारतात. त्यानंतर त्याच्यावर उपचार केले जात असल्याचा आरोप होत आहे. या अगोदर खते घेताना शेतकर्‍यांना त्यांची जात विचारली जात होती. आता उपचारासाठी आलेल्या रुग्णांनाही जात विचारत असल्याने आता जात पाहून उपचार होणार का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.

मुलीला उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले असता येथे केसपेपर काढल्यानंतर महिला डॉक्टरने केसपेपरवरील कॉलम भरण्यासाठी जात विचारली. ती सांगितल्यानंतर त्यांनी मुलीला इंजेक्शन दिले. यामुळे प्रश्न पडला की शासकीय हॉस्पिटलमध्ये जात का विचारली जात आहे. – कल्याण धिवर, रुग्ण नातेवाईक, मनमाड.

हा प्रकार फक्त मनमाडलाच नव्हे तर इतर शासकीय रुग्णालयातही घडत असेल. त्यामुळे हा कॉलम रद्द करावा अन्यथा रिपाइंतर्फे तीव्र आंदोलन छेडू. – गुरुकुमार निकाळे, रिपाइं युवा तालुकाध्यक्ष, मनमाड.

यात जातीपातीचा काही संबंध नाही. शासनाकडून आलेला हा फॉरमॅट असून, आम्ही तो भरून घेतो. उपचार करताना आम्ही जात पाहत नाही. आमच्यासाठी आलेला प्रत्येक रुग्ण एकसमान आहे. – डॉ. पवन राऊत, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, मनमाड.

हेही वाचा:

The post नाशिक : केसपेपरवरील जातीच्या उल्लेखास आक्षेप appeared first on पुढारी.

Exit mobile version