नाशिक : कॉलेजरोड परिसरातून ई-सिगारेटचा साठा जप्त

ई-सिगारेटा साठा जप्त,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तंबाखूयुक्त व प्रतिबंधित असलेल्या ई-सिगारेटचा साठा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कॉलेजरोड परिसरातून पकडला. संशयित हे महाविद्यालये, खासगी क्लासेसजवळील युवकांना ई-सिगारेटची विक्री करीत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कारवाई करीत ८० ई-सिगारेट जप्त केल्या आहेत.

सर्वेश रामधनी पाल (२८, रा. श्रमिकनगर, सातपूर) व फैसल अब्दुलबारे शेख (२८, रा. भाभानगर) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट एकचे अंमलदार नाझिमखान पठाण यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित ई-सिगारेटची विक्री करत असल्याचे समजले. त्यामुळे पथकाचे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कॉलेजरोड परिसरातील विजूस दाबेली दुकानाजवळील परिसरात सापळा रचला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, पठाण, आसिफ तांबोळी, महेश साळुंके, प्रशांत मरकड, मुक्तार शेख, किरण शिरसाठ यांच्या पथकाने दोघांना पकडले. त्यांच्याकडे वेगवेगळ्या फ्लेवरच्या बंदी असलेल्या ८० ई-सिगारेट आढळून आल्या. दोघांविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायद्यानुसार, तसेच सिगारेट व तंबाखू उत्पादने प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : कॉलेजरोड परिसरातून ई-सिगारेटचा साठा जप्त appeared first on पुढारी.