नाशिक : कोयता गँगचा पंचवटीतही धुमाकूळ

पंचवटी कोयता गँग www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

पुण्याप्रमाणेच नाशिकमध्येही कोयता गँगची दहशत सुरू झाली असून, पंचवटी परिसरात कोयता गँगने प्रचंड धुमाकूळ घातल्याची संतापजनक घटना घडली असून, या गँगने एका महिलेच्या घरावर पेट्रोल टाकून जाळपोळ केली आहे. शिवाय आजूबाजूच्या नागरिकांच्या घरांवर कोयत्याने हल्ला करून खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, कथित कोयता गँगने एकप्रकारे पोलिसांनाही आव्हान दिले आहे.

दिंडोरी रोडवरील अवधूतवाडी, सम्राटनगर येथे शनिवारी मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास सुमारे वीस ते पंचवीस टवाळखोरांनी येथील रहिवाशांच्या घरावर कोयते आणि दगडफेक करीत महिलांना अश्लिल शिवीगाळ केली. याबाबत, महिलांनी त्यांना विचारणा केली असता तुम्हाला काय करायचे ते करा, असे सांगत शिव्यांची लाखोली सुरूच ठेवली. यामुळे भयभीत झालेल्या महिलांनी फोन करून पंचवटी पोलिसांना पाचारण केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित प्रशांत राजेंद्र निकम (२८), बबलू हेमंत शर्मा (१९), सुनील निवृत्ती पगारे (२४, रा. अवधूतवाडी, पेठ रोड) तर दीपक किसन चोथवे (३४ रा. अश्वमेधनगर, पेठ रोड) या चौघांना अटक करून त्यांच्याकडून कोयते जप्त करण्यात आले असून, त्यांचे अन्य फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहे. चौघा साथीदारांना पोलिसांनी पकडल्याने संतप्त झालेल्या त्यांच्या इतर साथीदारांनी पुन्हा सम्राटनगर येथे येऊन संगीताबाई पुंडलिक बोडके (४०, रा. सम्राटनगर) या महिलेच्या घरावर बाटलीतून आणलेले पेट्रोल टाकून घराला आग लावली. या आगीमध्ये महिलेच्या घराचा दरवाजा, पडदा, बाहेर वाळत टाकलेले कपडे जळून खाक झाले. तर पद्मा दामू लोंढे या महिलेच्या घराच्या खिडक्यांच्या काचा कोयत्याने फोडण्यात आल्या. या टोळक्याने आजूबाजूच्या अनेक घरांवर कोयते मारून दहशत निर्माण केली. काहींनी घरांवर दगडफेक केली. या घटनेने घाबरलेल्या महिला घर सोडून इतरांच्या घरी रात्रभर राहिल्या. सकाळ झाल्यानंतर माध्यम प्रतिनिधींना बोलावून त्यांनी रात्री आपबिती कथन करीत संशयितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांत जाणाऱ्या महिलांना धमकावले
पोलिसांनी चौघांना अटक केली. मात्र, अटकेनंतर टवाळखोरांच्या इतर साथीदारांनी परिसरातील घराला आग लावण्याचा प्रयत्न केला व इतर घरांच्या काचा फोडून दगडफेक केली. मात्र, एवढा मोठा प्रकार पोलिसांना समजला नसल्याने येथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. तर रविवारी काही महिला फिर्याद दाखल करण्यास पोलिस ठाण्यात जात असल्याचे समजताच त्यांना रस्त्यात अडवून धमकविण्यात आल्याचे महिलांनी सांगितले.

काही संशयितांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेत चाैघा संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून कोयते जप्त केले आहेत. तक्रार देण्यास कोणीही पुढे आले नसल्याने पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घर जाळणे, तोडफोडची माहिती पीडितांनी दिलेली नाही. तरी आम्ही स्वतः जाऊन पंचनामा करून गुन्हा दाखल करू. – युवराज पत्की, पोलिस निरीक्षक (गुन्हे).

हेही वाचा:

The post नाशिक : कोयता गँगचा पंचवटीतही धुमाकूळ appeared first on पुढारी.