नाशिक : कौटुंबिक मिळकतीच्या वादातून तिघा नातलगांचा खून करणार्‍यास जन्मठेप

जन्मठेप,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कौटुंबिक मिळकतीच्या वादातून काकू, भावजय व पुतण्याचा खून करून दुसर्‍या पुतण्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाने एकास मरेपर्यंत जन्मठेप व तीन लाख रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. इगतपुरी तालुक्यातील माळवाडी 2018 मध्ये चिमटेवस्तीत हे हत्याकांड झाले होते. सचिन नामदेव चिमटे (24, रा. माळवाडी) असे आरोपीचे नाव आहे.

इगतपुरी तालुक्यातील माळवाडी, चिमटेवस्ती येथे 30 जून 2018 रोजी आरोपी सचिन चिमटे याने तिघांचा खून व एकावर प्राणघातक हल्ला केला होता. कौटुंबिक मिळकतीच्या वादातून सचिन याने सकाळी 9.30 ते 10 च्या सुमारास त्याची काकू हिराबाई शंकर चिमटे (55), वहिनी मंगल गणेश चिमटे (30), पुतण्या रोहित गणेश चिमटे (4) व यश गणेश चिमटे (6) या चौघांवर धारदार शस्त्राने वार केले होते. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला, तर यश गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी सचिन विरोधात घोटी पोलिस ठाण्यात खुनाचा व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी घोटी पोलिसांनी सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या महत्त्वाच्या खटल्यासाठी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केला. त्यांनी वेळोवेळी तपासी अधिकार्‍यांनी घेतलेले जबाब आणि परिस्थितीजन्य सबळ पुराव्यांसहित 12 साक्षीदार तपासले. या प्रकरणी तांत्रिक पुराव्यांसहित प्रत्यक्षदर्शींची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यानुसार न्यायाधीश एम. व्ही. भाटिया यांनी आरोपी सचिन यास प्रत्येक खुनाप्रकरणी मरेपर्यंत तीन वेळा जन्मठेप व पुतण्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी जन्मठेप असे एकूण चार जन्मठेप व तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम मृतांच्या नातलगांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

असे घडले हत्याकांड
30 जून 2018 रोजी आरोपात भाऊ गणेश शंकर चिमटे हे घराबाहेर गेले होते. यावेळी गणेश यांची आई, पत्नी व मुले घरात होते. सकाळी 9.30 वाजता आरोपी सचिन घरात शिरला. त्याने घरातील चारही सदस्यांवर धारदार शस्त्राने वार केले. यावेळी यशच्या हातावर घाव बसल्याने तो आरडाओरडा करीत घराबाहेर पळाला. त्यावेळी ग्रामस्थांनी चिमटे यांच्या घराकडे धाव घेतली. घटनेत सासू-सुनांचा जागीच, तर रोहितचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्वरित घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी 21 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले होते.

हेही वाचा :

The post नाशिक : कौटुंबिक मिळकतीच्या वादातून तिघा नातलगांचा खून करणार्‍यास जन्मठेप appeared first on पुढारी.