नाशिक क्राईम : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का प्रस्तावित

मोक्का,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात गेल्या दहा दिवसांत तीन घटनांमध्ये गुन्हेगारांनी वाहनांची तोडफोड, जाळपोळ करीत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांचा धाक नसल्यागत गुन्हेगार सर्रास गुन्हे करीत असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, नाशिकरोड येथे तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

सोमवारी (दि.२४) विहितगावात पंधरा वाहनांची तोडफोड व जाळपोळीची घटना घडल्यानंतर मंगळवारी (दि.२५) मध्यरात्री पुन्हा नाशिकरोडच्या धोंगडे मळ्यात समाजकंटकांनी सहा वाहनांची तलवार व कोयत्याने तोडफोड केली. त्यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या खासगी वाहनाचीही तोडफोड झाली. हा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला. तोडफोडीच्या आवाजाने नागरिकांनी घराबाहेर आले होते. या घटनेने नागरिकांमध्ये संताप पसरला असून गुन्हेगारांवर ठोस कारवाई होत नसल्याची ओरड हाेत आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयितांची धरपकड करण्यात आली आहे. तसेच या टोळीतील काही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात मोक्का कारवाई प्रस्तावित केली जात आहे.

उपनगरच्या गुन्ह्यातील संशयितांवर ‘मोक्का’ प्रस्तावित आहे. या टोळीतील गुन्हेगारांनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारीकृत्य करण्यास संशयित धजावणार नाहीत. गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलिस कठोर भूमिका घेत आहेत. नागरिकांनी भयभीत न होता गुन्हेगारांविरोधात ११२ क्रमांकावर तक्रार,माहिती द्यावी.

– प्रशांत बच्छाव, उपायुक्त, गुन्हे

 

सलग दोन दिवस शहरात तोडफोड तसेच गाड्या जाळून दहशत माजविण्याचा गुन्हेगारांनी प्रयत्न केला. ही अराजकता खपवून घेतली जाणार नाही. हे कायद्याचे राज्य आहे. मी पोलिस आयुक्त यांना निर्देश दिले असून मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची देखील सूचना दिली आहे. गुन्हेगारांविरोधात कुठलीही तमा बाळगली जाणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असो त्याला शासन नक्की होणार. पोलिसांना कोंबिंग ऑपरेशन तसेच गस्त वाढविण्याचे आदेश दिले आहेत. शहराची शांतता आणि सुरक्षितता याला प्राधान्य आहे.

– दादा भुसे, पालकमंत्री

हेही वाचा : 

The post नाशिक क्राईम : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का प्रस्तावित appeared first on पुढारी.