नाशिक क्राईम : वाहनाच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

अपघात www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वाहनाच्या धडकेत ८१ वर्षीय पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना अमृतधाम चौक परिसरात घडली. मनोहर अण्णाजी नानोटी (रा. गंगोत्री विहार, अमृतधाम) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. अमृतधाम चौकात ८ मे रोजी संशयित वाहनचालक धीरज प्रल्हाद राठोड (रा. विधातेनगर, वडाळा शिवार) याने भरधाव वाहन चालवून मनोहर नानोटी यांना धडक दिली होती. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात धीरज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरफोडी करून लॅपटॉप, कॅमेरा लंपास
नाशिक : म्हसरूळ येथील वाढणे कॉलनी परिसरात चोरट्याने घरफोडी करून लॅपटाॅप आणि कॅमेरा असा ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. २५ एप्रिल ते १० मे दरम्यान चोरट्याने घरफोडी केली. या प्रकरणी चेतन मनोहर बिरारी याने म्हसरूळ पोलिस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली आहे.

जिजामाता कॉलनीत घरफोडी
नाशिक : गंगापूर शिवारातील जिजामाता कॉलनी परिसरात चोरट्याने ११ ते १२ मे दरम्यान घरफोडी करून ५३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मयूर दिलीप मोरे यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने घरफोडी करून घरातील सोने-चांदीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुकानातून रोकड लंपास
नाशिक : कपड्यांच्या दुकानातून चोरट्याने दीड लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केल्याची घटना सराफ बाजारातील न्यू गणेश टेक्स्टाईल दुकानात घडली. सुकेशनी सोहनसिंग राजपुराेहित (रा. कृष्णानगर) यांच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि.१२) सकाळी ११.३५ च्या सुमारास त्यांनी दुकानातील साड्यांवर रोकड असलेली बॅग ठेवली होती. मात्र चोरट्याने ती लंपास केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.

बसस्थानकातून वृद्धेचे दागिने लंपास
नाशिक : महामार्ग बसस्थानक परिसरातून चोरट्याने इंदूबाई विठ्ठल गवांदे (७२, रा. बोरिवली इस्ट) यांच्याकडील ४० हजार रुपयांची सोन्याची पोत लंपास केली. इंदूबाई या शनिवारी (दि.१३) दुपारी १२.३० च्या सुमारास बसस्थानकात असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने पोत चोरून नेली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक क्राईम : वाहनाच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी appeared first on पुढारी.