Site icon

नाशिक : खड्डे बुजविण्यासह नव्याने अस्तरीकरण करण्याचे मनपाचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहरात सलग पंधरा दिवस संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांचे पितळ उघडे पडले. केवळ जुने रस्तेच नव्हे, तर नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवरही मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यांच्या कामाचा दर्जाही समोर आला. दर्जाहीन कामामुळे मनपाचा सार्वजनिक बांधकाम विभागही वादात सापडल्याने ही बाब अंगलट येऊ नये, यासाठी आता या विभागाने सहा विभागांत नव्याने काम केलेल्या 14 ठेकेदारांना नोटीसद्वारे दट्टे देत नव्याने अस्तरीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था समोर आल्याने याबाबत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून मनपाच्या कामकाजाविषयी असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडत असल्याने मनपाच्या या कामांवर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होतो. याशिवाय मनपाचा गुणवत्ता विभागाचे नेमके कामकाज काय? अशी विचारणा केली जात आहे. यामुळेच नवीन रस्त्यांवर खड्डे बुजण्यासह नव्याने अस्तरीकरण करण्याचे आदेश शहर अभियंता नितीन वंजारी यांनी ठेकेदारांना दिले आहे. पाऊस उघडल्यामुळे डांबराने खड्डे भरण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

6242 खड्डे मुरमानेच भरले

शहरात आतापर्यंत जवळपास 6242 खड्डे बुजविल्याचा दावा बांधकाम विभागाने केला आहे. तात्पुरत्या स्वरूपात भरलेले खड्डे आता पाऊस थांबल्याने नव्याने डांबर भरण्याचे काम सुरू असल्याचे नितीन वंजारी यांनी सांगितले. बांधकाम विभागाने पंचवटी विभागातील दोन, नाशिकरोड विभागातील तीन, नाशिक पूर्व विभागात तीन, पश्चिममध्ये एक, सातपूरमधील दोन, तर सिडको विभागात तीन ठेकेदारांना नोटीस बजावली आहे.

आयुक्तांकडून गंभीर दखल

नूतन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले असून, त्यानुसार बांधकाम विभागाने तात्पुरते खड्डे बुजविले आहेत. तसेच डिफेक्ट लायबिलिटी असलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने तसेच अनेक रस्त्यांची चाळण झाल्याने संबंधित ठेकेदारांवर कारवाईचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार बांधकाम विभागाने डिफेक्ट लायबिलिटी असलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने तसेच डांबर वाहून गेल्याने सहा विभागांतील 14 ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

25 एमएम इतकाच डांबराचा थर…

मनपातील काही अधिकारी, ठेकेदार आणि नगरसेवकांच्या संगनमतामुळे रस्त्यांच्या कामात दर्जा राखला जात नाही. गेल्या तीन वर्षांत शहरातील रस्त्यांवर जवळपास सहाशे कोटी इतका अफाट खर्च झाला आहे. असे असताना दरवर्षी पावसाळ्यात नाशिककरांना खड्ड्यांना सामोरे जावे लागते. डांबरीकरण करताना नियमानुसार 50 एमएम डांबराचा पहिला थर देणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी 25 ते 30 एमएम इतकाच डांबराचा थर देऊन मलमपट्टी केली जाते.

जुलै महिन्यात सर्वांधिक खराबी

जूनपाठोपाठ जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. गेल्या तीन वर्षांत तयार करण्यात आलेल्या नवीन रस्त्यांवरही खड्डे पडल्याने नागरिकांकडून मनपाच्या कामकाजावर टीका केली जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : खड्डे बुजविण्यासह नव्याने अस्तरीकरण करण्याचे मनपाचे आदेश appeared first on पुढारी.

Exit mobile version