नाशिक : खड्डे, वाहतूक समस्यांबाबत राष्ट्रवादीचे आयुक्तांना साकडे

आयुक्त www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

नाशिक शहरातील खड्डे, वाहतूक कोंडी व इतर समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना निवेदन दिले. यावेळी माजी गटनेते गजानन शेलार, अनिता भामरे, गौरव गोवर्धने, सलिम शेख, मधुकर मौले, मनोहर कोरडे, मनीष रावल, महेश भामरे, बाळासाहेब जाधव, समाधान तिवडे आदी उपस्थित होते.

नाशिक शहरातील चांगले रस्ते गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी खोदण्यात आले. परंतु त्यानंतर ते रस्ते पुन्हा व्यवस्थित करण्यात आले नाही. तसेच स्मार्ट सिटीने विकासकामांच्या नावाखाली खोदलेले रस्ते व कामे अर्धवट सोडल्याने गणेशोत्सवात याचा त्रास नागरिकांना होणार आहे. शहरातील जुन्या रस्त्यांवर खड्डे नसून नवीन केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामाच्या दर्जावर सवाल उपस्थित करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने महापलिका आयुक्तांना केली. शहरातील इतर ठिकाणच्या रस्त्यांवर पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांनी वारंवार तक्रार केल्यावर यातील मोजकेच खड्डे पेव्हरब्लॉक टाकून बुजविण्यात आले. परंतु पेव्हरब्लॉक टाकल्याने बाजूचे इतर खड्डे जसेच्या तसे राहिले आहेत. खड्ड्यांमध्ये पेव्हरब्लॉक टाकल्याने रस्त्यापेक्षा पेव्हरब्लॉक उंच होऊन वाहनांच्या टायरला त्याचा हादरा बसल्याने अपघात घडत आहे. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला जाण्यासाठी विलंब होत असल्याने रुग्णाचे हाल होताना दिसत आहे. नाशिक शहरातील विविध ठिकाणी विशेषतः संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी पूर्वीप्रमाणे ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करण्यात यावी. तसेच पाऊस उघडल्याने शहरातील रस्ते तातडीने पूर्ण करण्यात यावे. नवीन रस्ते करताना डांबरी रस्ते न करता आरसीसी रस्ते करण्यात यावे, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांना केली.

हेही वाचा:

The post नाशिक : खड्डे, वाहतूक समस्यांबाबत राष्ट्रवादीचे आयुक्तांना साकडे appeared first on पुढारी.