नाशिक : खतांच्या साठवणुकीसाठी रेल्वे गोदामात जागा द्या – खा. हेमंत गोडसे

हेमंत गोडसे,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
खरिपाचा हंगाम असल्याने येत्या काही महिन्यांत शेतकर्‍यांना विविध खतांची मोठ्या प्रमाणावर गरज भासणार आहे. राज्य आणि राज्यातील विविध कंपन्यांकडून येणारी रेल्वेद्वारे येणारी खते साठविण्यासाठी नाशिकरोड येथील रेल्वे धक्का गोदामात जागा कमी पडू नये, यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना गुरुवारी (दि. 14) खासदार हेमंत गोडसे यांनी भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे प्रबंधकांना केल्या आहेत.

मागील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकर्‍यांना खते पुरवणार्‍या विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली होती. खरिपात मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांना खतांची गरज पडणार असून, तुटवडा पडू नये यासाठी खत कंपन्यांनी तातडीने योग्य ते नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केल्या होत्या. शासनाने ठरवून दिलेला खतांचा कोटा लवकरच पुरविण्यात येणार असल्याची ग्वाही यावेळी खतविक्रेत्या कंपनीच्या प्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाला दिली होती. विविध कंपन्यांकडून येणारी खते साठविण्यासाठी आणि खतांनी भरलेल्या रेल्वे रॅक उभ्या करण्यासाठी नाशिकरोड येथील रेल्वे धक्का गोदामात जागा उपलब्ध आहे का किंवा किती याची शहानिशा करण्याकामी जिल्हा प्रशासनाने चार दिवसांपूर्वी रेल्वे धक्का गोदामाला भेट दिली होती.

रेल्वे मालधक्का गोदामात सिमेंटने भरलेल्या रॅक मोठ्या प्रमाणावर उभ्या होत्या. तर गोदामात सिमेंटचा अनावश्यक साठाही मोठ्या प्रमाणावर असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, खतांचा साठा करण्यासाठी गोदामात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल गोडसे यांनी घेतली. खरिपाचा हंगाम तोंडावर आल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणावर खतांची गरज पडणार आहे. पिकांना वेळेवर खते मिळत नसल्याने हाताशी आलेले पीक वाया जाऊन शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होते. खतांचा तुटवडा होऊ नये यासाठी रेल्वे धक्का गोदामात खते साठवणुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी गोडसे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : खतांच्या साठवणुकीसाठी रेल्वे गोदामात जागा द्या - खा. हेमंत गोडसे appeared first on पुढारी.