नाशिक : खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन! वाचविले माय लेकराचे प्राण

निफाड: पोलिसांनी वाचविले माय लेकराचे प्राण,www.pudhari.news

नाशिक/ निफाड : दीपक श्रीवास्तव, पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यातील सायखेडा येथे गोदावरी नदीवर असलेल्या पुलावरून उडी मारुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या माय लेकराला सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कादरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दक्षतेमुळे जीवदान मिळाले आहे. खाकी वर्दीतील माणुसकी वरील विश्वास वाढविणाऱ्या पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवार दि. 9 सप्टेंबर रोजी सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी. वाय. कादरी हे बंदोबस्ताच्या दृष्टीने सकाळी दहा वाजेचे सुमारास गोदावरी नदी पुलावर पहाणी करीत असताना एक महिला आपल्या छोट्या मुलासह नदीत उडी मारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तातडीने धाव घेऊन तिला रोखले. कादरी यांनी संबंधित महिलेचे विचारपूस केली असता तीचे नाव पल्लवी गोरख माळी राहणार ब्राह्मणवाडे तालुका निफाड असे असून कौटुंबिक त्रासाला कंटाळून ती आपल्या पाच वर्षीय मुलासह नदीपात्रात उडी मारून जीव देणार होती.

पोलीस निरीक्षक कादरी यांनी महिलेला व तिच्या मुलाला कपडे आणि खाऊ देऊन तिची घराकडे पाठवणी केली.

या दरम्यान तेथून जाणारे स्थानिक ग्रामस्थ अश्फाक शेख, भाऊसाहेब सासाने, सद्दाम शेख तसेच महिला पोलीस कर्मचारी उर्मिला काटे आदींनी देखील प्रसंगाचे गांभीर्य ओळखून सदर महिलेची समजूत घालीत तिला आत्महत्यापासून परावृत्त केले. सदर महिलेची समस्या जाणून घेत पोलीस निरीक्षक कादरी यांनी तिला व तिच्या मुलाला कपडे आणि खाऊ देऊन तिची घराकडे पाठवणी केली. पोलीस निरीक्षक कादरी यांच्या रूपाने या मायलेकरांसाठी जणू देवच धावून आला असे मत ग्रामस्थांकडून व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन! वाचविले माय लेकराचे प्राण appeared first on पुढारी.