नाशिक : गद्दाराने प्रश्न विचारायचे नसतात : आदित्य ठाकरे यांचे सुहास कांदेंवर टीकास्त्र

आदित्य ठाकरे, सुहास कांदे 2

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

आदित्य ठाकरे हे आज शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या मतदार संघात आहेत. आज त्यांचा मनमाड येथे मेळावा पार पडतो आहे. दरम्यान त्यांना भेटून प्रश्न विचारणार आहे, काही सवाल करणार आहे, त्याची उत्तरे आदित्य ठाकरे यांनी द्यावी असे आव्हान कांदे यांनी आदित्य ठाकरे यांना दिले होते. मात्र, गद्दारांना उत्तर देण्यासाठी मी कटीबद्ध नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी या मेळाव्यात स्पष्ट केले आहे.

आदित्य ठाकरे यांना दौ-याआधी सवाल करणा-या कांदे यांना त्यांनी यावेळी चांगलेच फैलावर घेतले. गद्दाराने प्रश्न विचारायचे नसतात, त्यांना उत्तर देण्यास मी कटीबद्ध नाही असे टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी सुहास कांदे यांच्यावर सोडले. आमदार कांदे यांनी आदित्य ठाकरे यांनी भेटू न दिल्यास रस्त्यावर आंदोलन करु असे म्हटले होते. त्यावर कुणीही गुंडगीरी करु नये ही लोकशाही असल्याचे आदित्य ठाकरे यांनी मेळाव्यात शिवसैनिकांशी बोलताना सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवरही जोरदार निशाणा साधला. राज्यात सध्या 40 गद्दारांचे सरकार आहे. हे गद्दार नजरेला नजर भिडवू शकत नाही. त्यांचे सरकार बेकायदेशीर असून ते लवकरच कोसळणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. या गद्दारांचे राजकारण लोकशाहीला, माणूसकीला व महाराष्ट्राला पटणारे नाही. त्यामुळे ते लवकरच कोसळेल, लिहुन घ्या… असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

The post नाशिक : गद्दाराने प्रश्न विचारायचे नसतात : आदित्य ठाकरे यांचे सुहास कांदेंवर टीकास्त्र appeared first on पुढारी.